कोल्हापूर : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘विकसित भारत युवा संवाद’ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी प्रशिक्षणार्थींना लोकशाही मूल्ये, मतदानाचे महत्त्व, जबाबदार नागरिकत्व आणि विकसित भारताच्या उभारणीत शिक्षणाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.

लोकशाही व्यवस्थेत मतदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय संविधानाने १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. या अधिकाराचा वापर करून नागरिकांना आपल्या पसंतीचे लोकप्रतिनिधी निवडता येतात. त्यामुळे तरुणांनी जबाबदार नागरिक म्हणून मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले.

विकसित भारताच्या निर्मितीत शिक्षण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते. विशेषतः व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांनी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. त्याचबरोबर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देत देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाचे प्रतिनिधी शुभांग शिरोडकर यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. मतदार यादीतील नावनोंदणी, तपशीलांची पडताळणी आणि अद्ययावतीकरण प्रक्रियेची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख यांनी ‘माय भारत’ पोर्टलच्या माध्यमातून युवकांना उपलब्ध होणाऱ्या विविध संधी आणि उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे अधीक्षक गणेश भोसले यांनी लोकशाही मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करून प्रशिक्षणार्थींना लोकशाहीची शपथ दिली. कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थींनी निवडणूक प्रक्रिया, एसआयआर मोहीम आणि स्टार्टअपविषयी विचारलेल्या प्रश्नांना उपस्थित मान्यवरांनी उत्तरे दिली. यावेळी संस्थेचे प्राचार्य महेश आवटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सतीश माने, अभिजीत पोवार, शिल्पनिदेशक, गटनिदेशक, प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.







