कोल्हापूर : महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीतील ‘१०, जनपथ’ या निवासस्थानी भेट घेऊन कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा विषय संसदेत मांडावा, अशी विनंती केली. बांधकाम क्षेत्रातील विविध समस्या आणि थकीत देयकांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाबाबत शिष्टमंडळाने राहुल गांधी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे पूर्ण करूनही शासनाकडून देयके वेळेत मिळत नसल्याने छोटे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. कंत्राटदारांच्या हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी प्रत्येक स्तरावर आवाज उठविला जाईल, अशी ग्वाही गांधी यांनी दिली. शिष्टमंडळात अध्यक्ष एन. डी. लाड, कार्याध्यक्ष प्रवीण उंबरकर, विश्वस्त सुनील नागराळे, खजिनदार संजय पाटील, उपाध्यक्ष किसन पानसरे, पुरवठादार संघटना अध्यक्ष प्रदीप पाटील, हर्षवर्धन शेख, अरविंद वाळेणकर, भूपेंद्र जाधव, नितीश पाटील आणि अजिंक्य लाड यांचा समावेश होता.






