इस्लामाबाद : भारतासोबत व्यापार बंद झाल्यामुळे पाकिस्तानला आतापर्यंत सुमारे ४० अब्ज डॉलरचे (४,००० कोटी डॉलर) आर्थिक नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तान-भारत व्यापार परिषदेचे (PIBC) अध्यक्ष नूर मोहम्मद कसूरी यांनी केला आहे. २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबतचा व्यापार बंद झाल्याने पाकिस्तानी अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील व्यापार संबंध पुन्हा सुरू करण्याचे आवाहन कसूरी यांनी केले आहे. व्यापार पूर्ववत झाल्यास दोन्ही देशांतील व्यापाऱ्यांना फायदा होईल. तसेच गुंतवणूक, पर्यटन आणि प्रादेशिक सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. द्विपक्षीय व्यापार बंद झाल्यामुळे पाकिस्तानी कंपन्यांना आवश्यक कच्चा माल आणि इतर वस्तूंसाठी दूरच्या देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक आणि मालवाहतुकीचा खर्च वाढला असून, वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याचे कसूरी यांनी नमूद केले.

भारताकडून आयात सुरू झाल्यास मोठी बचत शक्य
कसूरी यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानचा औषध उद्योग भारतातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून होता. भारतातून आयात पुन्हा सुरू झाल्यास पाकिस्तानची दरवर्षी २ ते ३ अब्ज डॉलरची बचत होऊ शकते.देशांतर्गत कापूस उत्पादन घटल्यामुळे पाकिस्तानच्या वस्त्रोद्योगाला ब्राझील, इजिप्त, चीन आणि अमेरिकेतून कापूस आयात करावा लागत आहे. यामुळे सुमारे ५ अब्ज डॉलरचा अतिरिक्त खर्च झाल्याचा दावाही त्यांनी केला. भारताकडून साखर, खते, सिमेंट, पेट्रोलियम उत्पादने, लोखंड-पोलाद, भाजीपाला आणि अवजड यंत्रसामग्रीची आयातही पाकिस्तान करू शकतो. भारतीय तेलशुद्धीकरण प्रकल्प पाकिस्तानच्या तुलनेने जवळ असल्याने पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा कमी खर्चात आणि कमी वेळेत होऊ शकतो, असे कसूरी यांनी स्पष्ट केले.

कापूस उत्पादन घटल्याचा वस्त्रोद्योगाला फटका
पाकिस्तानमधील कापूस लागवडीचे क्षेत्र कमी होत असल्याबद्दल कसूरी यांनी चिंता व्यक्त केली. पारंपरिक कापूस उत्पादक भागांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडीकडे वळत आहेत. याचा परिणाम देशातील वस्त्रोद्योगासह एकूण अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. देशांतर्गत कापूस उत्पादन वाढवण्यासाठी अधिक प्रभावी कृषी धोरणांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याबरोबरच आपल्या पूर्वजांची गावे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातूनही पर्यटनाला चालना मिळू शकते, असे कसूरी यांनी म्हटले आहे.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून चर्चेचे आवाहन
राजकीय मतभेद आर्थिक सहकार्याच्या आड येऊ नयेत, असे आवाहन कसूरी यांनी केले. दोन्ही देशांमधील प्रलंबित प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक संबंध आहेत. या संबंधांच्या आधारावर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारता येऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रादेशिक आर्थिक सहकार्याचा उल्लेख करताना कसूरी यांनी श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या काळात भारताने केलेल्या आर्थिक मदतीचे उदाहरण दिले. संकटाच्या काळात शेजारी देशांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे हे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कठोर भूमिका
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे फेब्रुवारीऐवजी २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली. त्यामध्ये सिंधू जल करार स्थगित ठेवणे आणि व्हिसासंबंधी निर्बंधांचा समावेश होता. यानंतर भारतीय लष्कराने मे २०२५ मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुमारे चार दिवस लष्करी संघर्ष सुरू होता. १० मे २०२५ रोजी दोन्ही देशांमध्ये लष्करी कारवाई थांबवण्याबाबत सहमती झाली. या घटनांनंतर पाकिस्तानच्या नेत्यांनीही विविध प्रसंगी झालेल्या नुकसानीचा उल्लेख केला आहे. आता भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्यासाठी पाकिस्तानकडून होत असलेल्या आवाहनामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Amaron






