रॅपिडो अॅपचा वापर टाळण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रॅपिडो (Rapido) अॅपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १० वाहनांवर कारवाई करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात रॅपिडो अॅपद्वारे व्यवसाय करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून कोणतीही परवानगी किंवा आदेश देण्यात आलेले नसल्यामुळे नागरिकांनी या अॅपचा वापर टाळावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ९३ नुसार प्रवासी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या अॅग्रीगेटरकडे सक्षम प्राधिकरणाचा वैध परवाना असणे आवश्यक आहे. तसेच ‘महाराष्ट्र मोटार वाहन अॅग्रीगेटर नियम, २०२५’ हे १५ जुलै २०२५ रोजी अधिसूचित करण्यात आले असून, बाइक टॅक्सी सेवांसाठी लागू असलेल्या स्वतंत्र नियमांचे पालन करणेही बंधनकारक आहे. अॅपशी संलग्न वाहनांची वैध नोंदणी, आवश्यक प्रवासी वाहतूक परवाना, विमा, योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) यांसारखी कागदपत्रे अद्ययावत असणे आवश्यक आहे. यासोबतच वाहनचालकांची पात्रता, वाहनांची सुरक्षितता, प्रवाशांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे आणि तक्रार निवारण यंत्रणा याबाबतच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रॅपिडो अॅपद्वारे अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करताना आढळल्यास संबंधित चालकाचा वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि वाहन निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल.

रॅपिडो अॅपद्वारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्यवसाय करण्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने कोणतीही परवानगी किंवा आदेश दिलेले नाहीत. वैध परवान्याशिवाय प्रवासी वाहतूक करणे किंवा मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांचे उल्लंघन करणे आढळल्यास वाहनमालक, चालक अथवा अॅग्रीगेटरविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, अनधिकृत प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध करणे आणि अॅप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांवर लागू असलेल्या कायदे व नियमांची अंमलबजावणी करणे या उद्देशाने ही तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. वाहनमालक, चालक आणि अॅप-आधारित प्रवासी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी सर्व कायदे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी केले आहे.







