नवी दिल्ली : हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज १९ वा दिवस असून त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. पुढील काही दिवस त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू ठेवले आहे. याआधी दिल्ली उच्च न्यायालयानेही वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत केंद्र सरकारला त्यांच्या आरोग्यावर दररोज लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने, “प्रत्येक नागरिकाचे जीवन मौल्यवान आहे,” असे नमूद केले. सरकारनेही न्यायालयाला वांगचुक यांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिले.

वांगचुक यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात, “माझी प्रकृती इतकी गंभीर नाही की मी दोन-चार दिवसांत मरेन. वैद्यकीय चाचण्यांनुसार मी आणखी काही दिवस उपोषण सुरू ठेवू शकतो,” असे सांगत समर्थकांना चिंता न करण्याचे आवाहन केले होते. वांगचुक यांनी समर्थकांना उपोषण सोडण्याचा आग्रह करण्याऐवजी २० जुलै रोजी संसदेकडे निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “माझी प्रकृती पूर्णपणे चांगली नाही, पण इतकी वाईटही नाही. माझे उपोषण सोडण्यास सांगण्यापेक्षा २० जुलैच्या शांततापूर्ण संसद मोर्चात सहभागी व्हा,” असे त्यांनी म्हटले.
सीजेपी (Cockroach Janta Party) चे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज (१६ जुलै) देशभरात एकदिवसीय सामूहिक उपोषणाचे आवाहन केले आहे. त्यांनी समर्थकांना रिकाम्या ताट-भांड्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून #ISupportSonam या हॅशटॅगद्वारे आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. आंदोलनस्थळी आज कोणतेही अन्न उपलब्ध करून दिले जाणार नसल्याचीही घोषणा करण्यात आली. वरिष्ठ फिजिशियन डॉ. सतीश लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांचे आतापर्यंत सुमारे ९ किलो वजन घटले असून त्यांचे सध्याचे वजन ५६ किलो आहे. त्यांच्या शरीरातील स्नायूंचे प्रमाण कमी झाले असून युरिक ॲसिडची पातळी वाढली आहे. त्यामुळे येणारे काही दिवस त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि धोकादायक ठरू शकतात. तपासणीत त्यांची रक्तातील साखरेची पातळी ८० मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर असून नाडीचा वेग प्रति मिनिट ७२ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.








