राष्ट्रीय जंतनाशक दिन; ३ नोव्हेंबरला मॉप-अप दिनाचे आयोजन
कोल्हापूर : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ६०० बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दिवशी गोळी न मिळालेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे. पात्र बालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केले आहे.

आतड्यांतील परजीवी जंतांमुळे बालकांमध्ये रक्तक्षय व कुपोषण होण्यासह त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, परिसराची स्वच्छता आणि नियमित जंतनाशक उपचार महत्त्वाचे आहेत. मोहिमेंतर्गत १ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रांमध्ये, तर ६ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये अल्बेंडाझोलची गोळी देण्यात येणार आहे. शाळाबाह्य बालकांनाही अंगणवाडी केंद्रांमार्फत औषध देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गैरहजेरी किंवा अन्य कारणांमुळे २७ ऑक्टोबर रोजी गोळी न मिळालेल्या बालकांना ३ नोव्हेंबर रोजी औषध दिले जाईल. आजारी बालकांना प्रकृती सुधारल्यानंतरच जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

या मोहिमेत ग्रामीण भागातील ४ लाख ८८ हजार ८७१, नागरी भागातील ७७ हजार ३१३ आणि शहरी भागातील २ लाख ९ हजार ४१६ बालकांचा समावेश आहे. मोहिमेसाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून त्याचे वितरणही करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जंतनाशक उपचारांमुळे बालकांचे आरोग्य व पोषण सुधारण्यास, शैक्षणिक उपस्थिती वाढण्यास तसेच त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.







