कोल्हापूर : दिवाळी सणापूर्वी स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या ध्वनी मापनाची चाचणी सायबर कॉलेज ग्राऊंड येथे घेण्यात आली. सुट्टे फटाके, फटाक्यांच्या माळा यांसह विविध प्रकारच्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता यावेळी मोजण्यात आली. विहित मर्यादेत असणाऱ्या फटाक्यांना प्रशासनाकडून दिवाळी सणादरम्यान बाजारात विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. शासन नियमानुसार विहित मर्यादेत नसणाऱ्या फटाक्यांना बंदी घालण्यात आली असून असे फटाके बाजारात विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे. तरी नागरिकांनी पर्यावरण पूरक, कमी आवाजाचे फटाक्यांचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या चाचणीवेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उप प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील, रोहीदास मातकर, कोल्हापूर महानगरपालिका पर्यावरण विभागाचे केवल लोट, सायबर कॉलेज पर्यावरण विभागाचे अभियंता डी.एस.माळी, डॉ. पूजा पाटील, निसर्ग मित्र अनिल चौगुले व अन्य सदस्य उपस्थित होते.







