सांगली : गोकुळ दूध संघ आणि सहकार क्षेत्रात सुरू असलेल्या कथित फसवणुकीविरोधात आमचा संघर्ष सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन या सर्व संकटांवर निश्चितपणे मात करू, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. बावची (ता. वाळवा, जि. सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, कोणत्याही संकटाचा सामना कसा करायचा आणि त्यावर मात कशी करायची, याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून मिळते. याच विचारांच्या बळावर सहकार क्षेत्रातील अन्यायाविरोधातील लढा अखेरपर्यंत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा…
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला मुदतवाढ; प्रशासक नियुक्ती टळली
या सोहळ्यास आमदार जयंत पाटील, हर्षदा देशमुख-जाधव, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख आणि सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, वाळवा पंचायत समितीचे सभापती उदय पाटील, डॉ. सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, वैभव शिंदे, बाळासाहेब पाटील, विजयराव यादव, संग्राम फडतारे, धैर्यशील पाटील, लालासो अनुसे, वैभव रकटे, पेठवडगावचे उपनगराध्यक्ष अभिजीत गायकवाड, डॉ. विकास बामणे आणि सरपंच कविता अनुसे यांच्यासह आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







