कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मौसमी रावसाहेब चौगुले यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल विभागाने शनिवारी (३१ ऑक्टोबर) यासंदर्भातील आदेश जारी केला. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेला तिढा न्यायालयात पोहोचला असतानाच चौगुले यांच्या पदोन्नतीचा आदेश आल्याने विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, या आदेशात त्यांना सध्याचा कार्यभार तातडीने सोडण्याचे निर्देश देण्यात आलेले नाहीत.

चौगुले या निवडणुकीसाठी अधिसूचित पदावर कार्यरत असल्याने भारत निवडणूक आयोगाची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया (SIR) पूर्ण होईपर्यंत त्या सध्याच्याच पदावर कार्यरत राहणार आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून ही प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच त्यांना पदोन्नतीच्या पदावर रुजू होता येणार आहे. त्यामुळे चौगुले यांना पदोन्नती आणि नवीन पदस्थापना मिळाली असली, तरी त्यांची सध्याच्या पदावरून तात्काळ कार्यमुक्तता झालेली नाही. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या नव्या पदावरील नियुक्तीची अंमलबजावणी होणार आहे.







