कोल्हापूर : मुख्यमंत्री महोदय ,आपण दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आणि साडेसहा वाजता आपल्याच पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विपरीत भूमिका मांडली, असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी भाजपातील विसंगतीवर बोट ठेवले. आमदार पाटील म्हणाले की, राज्यसभा खासदारांना
उत्तर देण्याची आवश्यकता नाही. कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ७० हजार मतांनी कोल्हापूरकरांनी उत्तर दिले होते.

असो , आपण कोरमचा वैधानिक मुद्दा मांडला आहे. पण चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असे आमचे म्हणणे आहे आणि न्यायालयात देखील आम्ही ते सांगितले आहे. पण निवडीसाठी कोरमचा पोटनियम आहे, असे जर आपले म्हणणे असेल तर १३ जणांचा कोरम होतो व आहे. जर तो नाही असे आपले म्हणणे असेल तर वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही ?

गोकुळच्या निवडणुकीत आमच्या समविचारी आघाडीच्या १३ उमेदवारांना निवडून देऊन मतदारांनी बहुमत दिले आहे. आता महायुतीचे जे बारा संचालक निवडून आलेले आहेत, त्यांनी दहा नोव्हेंबरला सभेला उपस्थित राहून गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करावा. यामुळे निश्चितपणे लोकशाही टिकेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढेल.तसेच पुढील पाच वर्षांच्या काळात निवडून आलेले सर्व २५ संचालक एकत्रितपणे काम करून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील.







