मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून आता पुन्हा राज्यात सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, २२ जुलैपासून राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांच्या माहितीनुसार, जुलैच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगल्या पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम विदर्भ आणि उत्तर कोकणातील काही भागात गुरुवारी झालेल्या पावसातून दिसून आला.

सध्या राज्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. पिकांना पावसाची गरज असून, येत्या काही दिवसांत अपेक्षित पाऊस झाल्यास मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटे आणि दुपारी मुंबईच्या उपनगरांसह मध्य मुंबईत हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. मात्र, या हलक्या पावसामुळे उकाड्यात फारसा फरक पडला नाही. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २२ जुलैच्या सुमारास बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होणार असून, २२ ते २५ जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.







