मुंबई : राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसह वीज कंपन्या आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतले आहेत. अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सण अग्रिमाची मर्यादा २० हजार रुपये करण्यात आली आहे. तर वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान आणि एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे.

अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना २० हजारांचे सण अग्रिम
राज्याच्या वित्त विभागाने गुरुवारी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. त्यानुसार, १ जानेवारी २००६ पासून सुधारित वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४,८०० रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा कर्मचाऱ्यांना आता २० हजार रुपयांचे सण अग्रिम घेता येणार आहे.दिवाळी, रमजान ईद, नाताळ, पारशी नववर्ष, संवत्सरी, रोश हशनाह, बुद्ध जयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा दहा सणांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या अन्य सणांसाठीही अग्रिम घेता येणार आहे.सण अग्रिम मंजूर करणे आणि त्याची वसुली करण्यासंदर्भातील पूर्वीच्या अटी व शर्ती कायम ठेवण्यात आल्या आहेत. ५ नोव्हेंबर २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना २० हजारांचे सानुग्रह अनुदान
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीसह महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांमधील सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तसेच विद्युत सहाय्यकांना १४ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.कामगार संघटनांनी केलेल्या मागणीची दखल घेत तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पाठवला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

एसटी कर्मचाऱ्यांना १० हजारांचा बोनस; महागाई भत्त्यातही वाढ
एसटी महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांची सण उचल आणि महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ देण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला. विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Amaron






