नांदेड : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास किंवा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांना आडवे करू, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे दिला. खासगी वित्तीय संस्थेच्या कर्जवसुलीच्या जाचाला कंटाळून जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अलीकडेच आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला. तसेच मृत शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत जाहीर केली.

शहरालगतच्या वाडी (बु.) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बालाजी कल्याणकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना थेट बांधावर जाणार आहे. हदगाव येथे लवकरच शिवसेनेच्या वतीने १०० मुलींची लग्ने लावून देण्यात येणार आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी ही शिवसेना असून, केवळ आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीवर आमचा भर आहे. ‘जिथे आपत्ती, संकट तिथे शिवसेना’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. शेतकरी संकटात असताना विरोधक राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

सध्या शेतकऱ्यांना मदतीची गरज असून, विरोधकांनी टीका करण्याऐवजी विधायक सूचना कराव्यात, असे आवाहन शिंदे यांनी केले. नांदेड जिल्ह्यात सिंचन व्यवस्था वाढविण्यासाठी १४ हजार ४० कोटी रुपयांची ११ कामे मंजूर करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना देण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत ही तातडीची अग्रीम मदत असून, यापुढेही मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये आणि धीर सोडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, नव्या उपजिल्हा रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. रुग्णालयाची क्षमता १०० वरून २०० खाटांपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली असून, त्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. तसेच रुग्णालयात सीटी स्कॅन आणि डायलिसिस सुविधा तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Amaron
‘थोडे प्रेम आमच्यावरही दाखवा’; अशोक चव्हाणांची शिंदेंकडे अपेक्षा
यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नांदेडच्या विकासकामांकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आपले प्रेम बालाजीरावांवर अधिक आहे. आम्हीही आपले जुने सहकारी आहोत. थोडे प्रेम आमच्यावरही दाखवा आणि आमच्याकडेही लक्ष द्या. नांदेडमध्ये आणखी विकासकामे करता येतील. राज्यात आपली युती असून आपण सर्वजण एकत्र काम करत आहोत.’

मृत शेतकरी कुटुंबाला पाच लाखांची मदत
मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत दिली. कुटुंबावर ओढवलेल्या दुःखद प्रसंगी आर्थिक आधार देत त्यांनी मदतीचा हात पुढे केला.







