पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पुणे : पुणे शहराच्या विकासाला आणि शहरातील वाहतुकीला पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे नवी गती मिळणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातील मोठ्या आयटी क्षेत्राला अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच शहरातील जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्क अधिक मजबूत होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-3’चे उद्घाटन आणि ‘पुणे मेट्रो टप्पा-2’च्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.

पुणे हे आयटी, ऑटोमोबाईल, फार्मा, स्टार्टअप, नवोपक्रम आणि उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असून, मेट्रोच्या वाढत्या सुविधांमुळे शहराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे नमूद करून प्रधानमंत्री म्हणाले, देशात 2014 मध्ये केवळ 248 किलोमीटरचे मेट्रो मार्ग कार्यरत होते. आज हे जाळे सुमारे 1200 किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, 26 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू आहे. दररोज एक कोटीहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करीत आहेत. भारतीय मेट्रो नेटवर्क जगातील पहिल्या तीन मोठ्या मेट्रो नेटवर्कमध्ये गणले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात 2014 मध्ये केवळ 10 ते 11 किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू होता. आज सुमारे 200 किलोमीटर मेट्रो मार्ग सेवेत असून, 680 किलोमीटरहून अधिक मार्गांची कामे सुरू आहेत. राज्यात मेट्रो पायाभूत सुविधांवर अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली असल्याचे श्री. मोदी म्हणाले. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचतो, शहराची उत्पादकता वाढते आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते. पुणे मेट्रोचा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर उभारण्यात आला असून, सरकार आणि खासगी क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांतून विकासाची नवी संधी निर्माण होत आहे. शहरांची स्पर्धात्मकता आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील शहरांना विकासाची केंद्रे बनविण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांच्या अर्बन चॅलेंज फंडला मंजुरी दिली आहे. या माध्यमातून आगामी काळात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होणार आहे. तसेच गेल्या 10 ते 12 वर्षांत 50 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर पडण्यास यश आल्याचा उल्लेख जागतिक बँकेच्या अहवालाच्या संदर्भाने त्यांनी केला. पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, वीज, पाणी आणि गॅस पाइपलाइनमधील गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे  प्रधानमंत्री मोदी म्हणाले. महाराष्ट्रातील प्रतिकूल हवामानामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशीलतेने उभे असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, संकटाच्या काळात सरकार त्यांना मदत करेल. दिवाळीच्या सणात दुष्काळग्रस्त आणि संकटात असलेल्या शेतकरी कुटुंबांचाही विचार करून त्यांच्या घरातही सणाचा आनंद निर्माण होण्यासाठी सर्वांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

2030 पर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआर क्षेत्र देशाचे महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बस, इनर रिंगरोड, आउटर रिंगरोड, बोगदे आणि नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे उभारण्यात येत आहे. या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून 2030 पर्यंत पुणे महानगर प्रदेश देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हिंजवडी आणि परिसर हा देशातील महत्त्वाचा आयटी हब आहे. या परिसरात दररोज हजारो कर्मचारी कामासाठी येतात. वाहतूक कोंडीमुळे त्यांना अनेकदा एक ते दोन तास अडकून पडावे लागते. मेट्रो सुरू झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विशेषतः तरुण- तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन 2018 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होत असल्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

देशात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) मेट्रो प्रकल्प उभारण्याच्या धोरणानंतर शिवाजीनगर-हिंजवडी हा पहिला प्रकल्प ठरला. डीबीओटी  तत्त्वावर टाटा प्रोजेक्ट्स आणि सीमेन्स यांनी या प्रकल्पाची उभारणी केली. केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य, व्यवहार्यता तफावत निधी आणि महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेले जमीन संपादन यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला. या प्रकल्पाच्या उभारणीपासून संचालनापर्यंत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून ही ‘पिंक पॉवर्ड’ मेट्रो महिला शक्तीच्या सहभागाचे प्रतीक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

पुणे शहरात सुमारे 120 किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार झाले असून काही मार्गांची कामे सुरू आहेत. देशातील मेट्रो विस्ताराचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला आहे. राज्यातील 12 महापालिका क्षेत्रांत मेट्रो सुरू आहे किंवा  तिचे काम सुरू आहे. मेट्रो ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आर्थिक विकासाला चालना देणारी यंत्रणा आहे. मेट्रोमुळे गुंतवणूक, रोजगार आणि त्याभोवतीचे आर्थिक परिसंस्थेचे जाळे विकसित होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुणे महानगर प्रदेशाला मोठे शहरी विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या माध्यमातून पुणे आणि पीएमआर परिसरात आधुनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे. पुणे मेट्रो ही ग्रीन मेट्रो म्हणून विकसित होत असून आवश्यक ऊर्जेपैकी 30 टक्के ऊर्जा स्वतः निर्माण करणार आहे. पुणे परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस, इनर व आउटर रिंगरोड, सीएमटीआर, भूमिगत मार्ग आणि बोगद्यांचे जाळे विकसित होत आहे. यामुळे पुणे केवळ आयटी आणि उत्पादन क्षेत्राचेच नव्हे, तर फ्रंटियर टेक्नॉलॉजीचेही महत्त्वाचे केंद्र बनेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात पुण्याचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

देशात पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच गरिबी निर्मूलन आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिक आणि समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य आणि मार्गदर्शन कायम मिळत राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; मेट्रोमुळे शहराच्या विकासाला सुपरफास्ट गती – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी करण्यामध्ये मेट्रो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मेट्रो-3 हा पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कलाटणी देणारा प्रकल्प असून, पुण्याच्या भविष्याला नवा आकार देणारा आणि नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या समस्या कमी करणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मेट्रोची ऐतिहासिक भेट मिळत आहे. दिलेला शब्द पाळून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची कार्यपद्धती सरकारने ठेवली असून, महाराष्ट्राचा विकास वेगाने पुढे जात असल्याचे शिंदे म्हणाले.

पुणे मेट्रो-3 हा देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात आलेला पहिला मेट्रो प्रकल्प आहे. राष्ट्रीय मेट्रो रेल धोरण 2017 अंतर्गत डीबीएफओटी पद्धतीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्प मिशन मोडवर पूर्ण केल्याबद्दल पीएमआरडीए, महामेट्रो, टाटा प्रोजेक्ट्स, सीमेन्स आणि संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये महिलांचा मोठा सहभाग असून, मेट्रो संचालनातही महिला महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत. महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, हे या प्रकल्पातून पुन्हा अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गामुळे पुण्याच्या विकासाला चालना मिळाली असून, मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार आहे. तसेच पुण्याभोवती रिंगरोड विकसित करण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल. पुणेकरांचे जीवन अधिक गतिमान आणि प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्याच्या विकासात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

मेट्रोमुळे पुणेकरांना मिळणाऱ्या सुविधांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सुरुवातीला पुण्यात मेट्रोला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, आतापर्यंत 90 लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली आहे. हा प्रवास आरामदायी आणि वेळेची बचत करणारा आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे. पुण्याला वाहतूक कोंडीमुक्त आणि आधुनिक शहर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पुणे मेट्रो मार्गिका-3 देशातील पहिली 100 टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असलेल्या पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची गरज लक्षात घेता आधुनिक, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. पुणे मेट्रो मार्गिका-3 ही देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) साकारलेली पहिली मेट्रो मार्गिका असून, सुमारे 8 हजार 313 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे, ही मार्गिका देशातील पहिली 100 टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार असून, सुमारे 100 महिला ट्रेन पायलट आणि स्थानकांवरील 50 टक्के महिला कर्मचारी या मार्गिकेचे संचालन करणार आहेत, हे अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

सन 2018 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेची पायाभरणी झाली होती. टप्पा-2 मधील चार विस्तारित मार्गिकांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, आज त्यांचे भूमिपूजन होत आहे. या 31 किलोमीटर लांबीच्या आणि 28 स्थानकांच्या मार्गिकांसाठी केंद्र सरकारने सुमारे 9 हजार 858 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या विस्तारामुळे वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी, कोथरूड, बावधन, विमाननगर, खराडी आणि वाघोली हे भाग जोडले जाणार असून, सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रोचे जाळे 100 किलोमीटरपेक्षा अधिक होईल. या मार्गावरील आर. के. लक्ष्मण संग्रहालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही स्थानके अनुक्रमे ‘कॉमन मॅन’ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करणारी ठरतील, असा उल्लेख त्यांनी केला.

पुणे मेट्रोच्या प्रत्येक सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) निर्मितीपासून मंजुरीपर्यंत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला, तसेच जुलै महिन्यात हिंजवडीतील मेट्रो स्थानकांची पाहणी करून कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या 426 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, ही कामे प्रत्यक्षात पूर्ण होण्याकडे पालकमंत्री म्हणून स्वतः बारकाईने लक्ष देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे वाहतूक कोंडी कमी होणार – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रोचे लोकार्पण आणि नवीन मार्गांचे भूमिपूजन हा ऐतिहासिक टप्पा आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किलोमीटरच्या मार्गामुळे पुणे मेट्रोचे जाळे 55 किलोमीटरपर्यंत विस्तारणार असून, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि लाखो नागरिकांना याचा लाभ होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पुणेकरांनी मेट्रोतून 9 लाख 58 हजार 603 प्रवास केले असून, मेट्रो ही आता पुणेकरांची जीवनवाहिनी बनली आहे. खडकवासला–खराडी, वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली आणि मानिकबाग–नळस्टॉप या सुमारे 46 किलोमीटरच्या नव्या मार्गांचे भूमिपूजनही होत आहे. यामुळे पुण्याच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागांची जोडणी अधिक सक्षम होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

पुण्याच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन मेट्रो विस्तारासोबतच पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस, इनर व आउटर रिंग रोड, भूमिगत रस्त्यांचे जाळे आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात असल्याचे श्री. मोहोळ म्हणाले. पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी  प्रास्ताविकातून मेट्रो प्रकल्पाची माहिती दिली.

यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि पुणे आय टी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी उपस्थित होते.

पुणे मेट्रो मार्गिका-3 ची ठळक वैशिष्ट्ये

पुणे मेट्रो मार्गिका-3 (पुणेरी मेट्रो) ही माण-हिंजवडी ते शिवाजीनगर अशी 23.203 किलोमीटर लांबीची मार्गिका असून या मार्गावर एकूण 23 उन्नत स्थानके आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी-डीबीएफओटी) तत्त्वावर विकसित करण्यात आलेला हा देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 8 हजार 313 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देणारी ही ‘पिंक मेट्रो’ असून या मार्गावर 90 महिला चालक मेट्रो चालविणार आहेत. तसेच प्रकल्पाच्या एकूण मनुष्यबळापैकी 50 टक्के कर्मचारी महिला असणार आहेत. हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला शिवाजीनगरशी थेट जोडणाऱ्या या मेट्रोमुळे हजारो आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि प्रवाशांना जलद, सुरक्षित व सुविधाजनक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

अजित पवार गटात हालचालींना वेग; सुनेत्रा पवारांनी मंगळवारी बोलावली आमदारांची बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणता...

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

‘शेतकऱ्यांना अडवाल तर आडवे करू’; मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

नांदेड : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास किंवा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांना आडवे करू, असा कडक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे दिला. खासगी वित्तीय संस्थेच्या...

वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

वाढत्या लोकसंख्येला, उद्योगांना वीज लागेल हे मान्य; पण जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

कर्जत : वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंद्यांसाठी अधिक वीज लागणार, हे मान्य आहे. मात्र, विजेची गरज भागवण्यासाठी जंगलतोड हाच एकमेव पर्याय आहे का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला. कर्जत परिसरातील डोंगरांमध्ये प्रस्तावित...

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; विशेष पथकाची स्थापना

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भात समोर आणलेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या...

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात घरगुती पाइप गॅस (PNG) जोडण्यांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींची मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या २४ तासांत देणे, काही शुल्क माफ करणे आणि २४ तास काम करण्याची परवानगी देणे अशा...

‘येत्या चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील; एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल!’ राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

‘येत्या चार-पाच महिन्यांत मोठ्या घडामोडी घडतील; एक वेळ अशी येईल की देशाला पंतप्रधानच नसेल!’ राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

मुंबई : देशातील वाढती महागाई, दुष्काळी परिस्थिती, नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत मोठं भाकीत केलं आहे. येत्या चार-पाच महिन्यांत...