मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या धडक कारवाया यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असून, अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर तपासणी आणि छापेमारी मोहिम राबवली आहे. या कारवाईत अनेक ठिकाणी भेसळयुक्त अन्नपदार्थांचे उत्पादन उघडकीस आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. काही कार्यालयांवर टाळेही ठोकण्यात आले आहे. या धडक मोहिमेमुळे राज्यातील खाद्यपदार्थ विक्रेते आणि मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये खळबळ उडाली असली, तरी सर्वसामान्य नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.

मुंढे यांनी सांगितले की, परवानाधारक अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षेशी संबंधित २२ विविध निकषांचे पालन करणे बंधनकारक आहे. अन्न तयार करणे, साठवणूक, विक्री, जाहिरात आणि विपणन अशा प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र, अनेक व्यावसायिक या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “जनतेच्या आरोग्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही. त्यामुळेच आता कठोर कारवाईची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, अन्नाचा दर्जा आणि सुरक्षेच्या नियमांशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, जुना अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा आता कालबाह्य झाला असून, त्याऐवजी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट (FSSAI) देशभर लागू करण्यात आला आहे. आता केवळ भेसळ रोखण्यापुरते मर्यादित न राहता सुरक्षित, दर्जेदार आणि मानकांनुसार अन्न नागरिकांना उपलब्ध करून देणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘पीटीआय’शी बोलताना तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एफडीएची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.







