कोल्हापूर : यावर्षी पावसाने कधी अतिवृष्टी तर कधी प्रदीर्घ खंड असे लहरी रूप दाखवल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भात, नाचणी, भुईमूग, सोयाबीन पिकांना याचा मोठा फटका बसला. मात्र, वेळेत पंचनामे होऊन शासनाची तातडीची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मदत मिळालेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.

जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्साहाने भात, नाचणी, भुईमूग यांची लागवड केली. मात्र, ऐन पीक जोमात असताना सप्टेंबर महिन्यात पावसाने खंड दिला. ज्या ठिकाणी भात बाहेर पडण्याची वेळ होती, तिथे पाणीच मिळाले नाही. तर काही ठिकाणी सततच्या पावसाने पिकांची वाढच खुंटली. परिणामी, अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले.

या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार महसूल व कृषी विभागाने तातडीने पावले उचलली. कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी गावागावांत जाऊन प्रत्यक्ष शेतात पीक पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून फॉर्म वेळेवर भरून घेतले. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५,००० रुपयांची तातडीची मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. ही प्रक्रिया जलद झाल्याने शेतकऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास वाढला आहे.

राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे येथील शेतकरी रामचंद्र गणपती ढेरे यांच्या शेतातील नाचणी व भात पिकांची पावसाअभावी वाढच झाली नाही. पीक पूर्ण वाळून गेले. पाहणीनंतर मदत खात्यावर जमा झाली. “संपूर्ण कुटुंब शेतीवरच अवलंबून आहे. बाहेर मजुरीचेही उत्पन्न नाही. अशा वेळी खात्यावर पैसे जमा झाले म्हणून आम्ही आभारी आहोत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Amaron
कौलव येथील शेतकरी दत्तात्रय चरापले यांच्या डोंगर भागातील भात पिकाचेही मोठे नुकसान झाले. “ऐन पावसाळ्यामध्ये पाऊस भरपूर झाला, तरीसुद्धा ज्यावेळी भात बाहेर पडायला आले, त्यावेळी सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झाला. त्यामुळे भाताचे पीक पूर्ण गेले,” असे त्यांनी सांगितले. कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांनी पंचनामे करून फॉर्म वेळेवर भरल्याने त्यांना ५,००० रुपयांची मदत मिळाली. “ही मदत समाधानकारक आहे. शासनाचा मी पूर्ण आभारी आहे,” असे ते म्हणाले.

पन्हाळा तालुक्यातील घोटवडे येथील शेतकरी राजेंद्र लक्ष्मण लवटे यांनी यावर्षी नाचणी व भाताचे पीक घेतले होते. पाऊस कमी पडल्याने पिकांची वाढ खुंटली आणि अतोनात नुकसान झाले. पंचनाम्यानंतर त्यांना ५,००० रुपयांची तातडीची मदत मिळाली. “या मदतीमुळे आमच्या कुटुंबाला हातभार लागला,” असे सांगत त्यांनी शासनाचे आभार मानले. कौलव येथीलच शेतकरी सुभाष भिवा पाटील यांच्या डोंगर भागातील भात पिकाचे पावसाने नुकसान झाले. “आमचे अवलंबित्व या शेतीवरच आहे. दिवाळीच्या सणासुदीत भाताचे नुकसान झाले असताना सणाच्या तोंडावर पंचनामा करून ही मदत मिळाली, याचे समाधान वाटले,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.







