कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत पदव्युत्तर (Postgraduate Broad-Speciality) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत तब्बल १ हजार ६६ जागांची वाढ केली आहे. त्यामुळे येत्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या एकूण जागांची संख्या तब्बल ७ हजार ६१५ जागावर पोहोचली आहे. वैद्यकीय क्षेत्रात देशात कर्नाटकनंतर महाराष्ट्राने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

या महत्त्वपूर्ण यशाबद्दल राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाधान व्यक्त करून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबत नियोजनबद्ध पद्धतीने केलेले प्रयत्न तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास व पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाय योजनांमुळे ही उल्लेखनीय वाढ साध्य झाल्याचे श्री मुश्रीफ यांनी नमूद केले.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) ६ नोव्हेंबर रोजी अद्ययावत केलेल्या जागांच्या आकडेवारीनुसार, मागील शैक्षणिक वर्षातील जागांच्या तुलनेत यंदा १६.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील राज्यनिहाय आकडेवारीत कर्नाटक ८,८६२ जागांसह प्रथम क्रमांकावर असून, महाराष्ट्र ७,६१५ जागांसह द्वितीय क्रमांकावर आहे.
राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एम.डी. व एम.एस. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एकूण ७२० अतिरिक्त जागांची भर पडली आहे.यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सर्वाधिक ७७ जागांची वाढ नोंदविण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर – ७३, सातारा -६४, धुळे – ४४, तर अंबरनाथ येथे ४० जागांची वाढ झाली आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे ३९ नवीन ( एम.डी )जागांची वाढ झाली असून कोल्हापूरच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे या वाढीमुळे महाविद्यालयातील विविध वैद्यकीय विभागांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
Amaron







