कोल्हापूर : गोकुळच्या सत्तासंघर्षातून कोल्हापुरात सत्तापरिवर्तनाची बीजे रोवली गेली असून, २०२९ मध्ये महाराष्ट्रात सत्ताबदल होणार असल्याचा ठाम इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला. ‘तुम्ही आमची कळ काढली, सुरुवात तुम्ही केली; आता शेवट आम्ही करणार. याचना नाही, “अब रण ऐसा होगा, फिर कभी जैसा नही होगा!” ,’ अशा आक्रमक शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. गोकुळच्या बचावासाठी कोल्हापुरात आयोजित संघर्ष मोर्चात ते बोलत होते.

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राज्य सरकारने हस्तक्षेप केल्याच्या निषेधार्थ राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खासदार शाहू छत्रपती, माजी मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, मालोजीराजे, आमदार ऋतुराज पाटील, राजीव आवळे, विवेकानंद पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी सतेज पाटील म्हणाले, गेल्या चार दिवसांत महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला फोन आले आहेत. कोल्हापूरकर गोकुळच्या न्याय्य हक्कांसाठी जो संघर्ष करत आहेत, त्याला संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा मिळत आहे. आमची भूमिका चुकीची नसून आम्ही केवळ न्यायाची मागणी करत आहोत. आमच्यावर अन्याय करू नका आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोकुळच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या संघर्षामुळे सामान्य माणसामध्येही लढण्याची आणि जिंकण्याची ताकद निर्माण झाली आहे. आपण एकजुटीने संघर्ष केला तर विजय मिळवू शकतो, हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी सत्तापरिवर्तनाची सुरुवात कोल्हापूरच्या भूमीतून झाली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. गोकुळवर चार प्रशासकीय संचालक नियुक्त करण्याचा निर्णय हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाही व्यवस्था संपवण्याचे हे मोठे षडयंत्र असल्याचा दावाही सतेज पाटील यांनी केला.







