तेहरानच्या अणुकेंद्रांसह क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि ऊर्जा सुविधांना लक्ष्य करण्याची शक्यता; इराणचा कठोर प्रत्युत्तराचा इशारा
मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर अमेरिका आणि इस्रायल इराणविरोधात मोठी लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे. इराणची अणुकेंद्रे, क्षेपणास्त्रे, ड्रोन साठे आणि ऊर्जा पायाभूत सुविधांना संभाव्य लक्ष्य केले जाऊ शकते. मात्र, या हल्ल्याच्या कोणत्याही योजनेला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नसल्याचे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

तीन दिवसांच्या तीव्र हल्ल्यांची शक्यता
वृत्तानुसार, अमेरिका आणि इस्रायलची संभाव्य लष्करी मोहीम अल्पकालीन; मात्र अत्यंत तीव्र स्वरूपाची असू शकते. इराणला अणुकरारासाठी राजी करण्याच्या उद्देशाने तीन दिवसांच्या हल्ल्यांची रणनीती आखली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.या संभाव्य कारवाईत इराणची अणुसुविधा, क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता, ऊर्जा पायाभूत सुविधा तसेच इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या कमांड सेंटरला लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्करी सामर्थ्याबरोबरच अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होऊ शकतो.

‘पिकॅक्स माउंटन’ अणुकेंद्रावरही हल्ल्याची शक्यता?
इराणमधील जमिनीखाली खोलवर असलेल्या ‘पिकॅक्स माउंटन’ या अणुकेंद्रावर संभाव्य हल्ल्याची चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात या ठिकाणाला लक्ष्य करण्यासाठी ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’ (MOAB) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुमारे २२ हजार पौंड वजनाच्या GBU-43/B बॉम्बच्या वापराबाबत विचार सुरू असल्याचे सांगितल्याचा उल्लेख वृत्तात करण्यात आला आहे. दरम्यान, इराणमधील तेलशुद्धीकरण कारखाने आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले करावेत की नाही, याबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे समजते. अशा सुविधांना लक्ष्य केल्यास जागतिक तेल बाजारावर परिणाम होऊन अमेरिकेत पेट्रोलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रावरील संभाव्य हल्ल्यांबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.

इराणचा अमेरिका-इस्रायलला कठोर इशारा
दुसरीकडे, इराणने अमेरिका आणि इस्रायलला स्पष्ट इशारा दिला आहे. इराणवर नव्याने हल्ला झाल्यास त्याचे प्रत्युत्तर मर्यादित राहणार नाही, असे इराणकडून सांगण्यात आले आहे. संभाव्य प्रत्युत्तरादाखल सौदी अरेबियातील तेल प्रकल्प, डेटा सेंटर आणि समुद्राखालील इंटरनेट केबल्स यांना लक्ष्य केले जाऊ शकते, असे संकेतही देण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे संघर्ष वाढल्यास त्याचे परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरते मर्यादित न राहता जागतिक ऊर्जा पुरवठा आणि डिजिटल पायाभूत सुविधांवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इस्रायली हवाई दलाचा इराणच्या सीमेजवळ सराव
दरम्यान, इस्रायलने सोमवारी इराणच्या सीमेजवळ हवाई सराव केल्याचे वृत्त आहे. या सरावात इस्रायली हवाई दलाची अनेक लढाऊ विमाने सहभागी झाली होती. ही विमाने सीरिया आणि इराकच्या हवाई क्षेत्रातून इराणच्या सीमेजवळ पोहोचली आणि त्यानंतर माघारी परतली.या सरावासाठी वापरण्यात आलेला मार्ग इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाईसाठी महत्त्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, या सरावाचा प्रत्यक्ष हल्ल्याशी संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.







