भारताने आश्रय दिल्याबद्दल मानले आभार; डिसेंबरपर्यंत मायदेशी परतण्याचा यापूर्वी व्यक्त केला होता मनोदय
नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी जीवाला धोका असतानाही मायदेशी परतण्याची तयारी दर्शवली आहे. बांगलादेशात परतल्यास आपल्याला ठार मारले जाऊ शकते, अटक होऊ शकते किंवा छळाला सामोरे जावे लागू शकते, याची जाणीव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोमवारी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला. यावेळी त्यांनी आपल्या मायदेशातील पूर्वीच्या अनुभवांचाही उल्लेख केला.

“आता मी निर्णय घेतला आहे. होय, मला याची जाणीव आहे. मी बांगलादेशात परतले, तर तिथे उतरताच ते मला ठार मारू शकतात, अटक करू शकतात किंवा माझा छळ करू शकतात,” असे शेख हसीना यांनी सांगितले. काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी डिसेंबरपर्यंत स्वतःहून बांगलादेशात परतण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र, सोमवारी झालेल्या ऑनलाइन संवादात त्यांनी मायदेशी परतण्याची निश्चित तारीख जाहीर केली नाही. या पत्रकार परिषदेला शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय उपस्थित होते. बांगलादेशमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करताना त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाहेर होणाऱ्या हत्या आणि अवामी लीगच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्याच्या घटनांवर आक्षेप घेतला.

भारताने आश्रय दिल्याबद्दल शेख हसीना यांचे आभार
बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारची सत्ता गेली. ऑगस्ट २०२४ पासून त्या भारतात वास्तव्यास असून, येथे त्यांनी स्वनिर्वासित जीवन स्वीकारले आहे.अमेरिकेतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भारत सरकार आणि भारतीय जनतेचे आभार मानले.“माझा देश सोडण्याची माझी तयारी नव्हती; मात्र, परिस्थितीमुळे मी कसाबसा इथपर्यंत पोहोचले. मला आश्रय दिल्याबद्दल मी भारत सरकारचे आणि येथील जनतेचे आभार मानते,” असे त्या म्हणाल्या.आपल्याविरोधात ६०० हून अधिक खटले दाखल करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे, प्रत्यक्ष गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना बांगलादेशमधील अंतरिम सरकारने संरक्षण दिल्याचा आरोप त्यांनी केला.

Amaron
सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरची पहिली पत्रकार परिषद
बांगलादेश सोडल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी शेख हसीना यांनी यंदा ऑगस्टमध्ये नवी दिल्ली येथे दक्षिण आशियातील परदेशी वार्ताहरांच्या संघटनेच्या कार्यक्रमात पहिली पत्रकार परिषद घेतली होती. २०२४ मध्ये आपल्याला देश सोडावा लागला असला, तरी आपण जनतेपासून कधीही दूर झालो नसल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.बांगलादेशात परतण्याच्या संभाव्य तारखेबाबत विचारले असता, “योग्य वेळ आल्यावर मी त्याबाबतची माहिती जाहीर करेन,” असे त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर शेख हसीना यांनी भारतीय माध्यमांशी पहिली दूरध्वनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या नेत्यांचा छळ केला जात असल्याचा आणि त्यांना यातना दिल्या जात असल्याचा आरोप केला.

‘बांगलादेशातील राजकीय संकट अनिश्चित काळ सुरू राहू शकत नाही’
सप्टेंबरमध्ये दिलेल्या मुलाखतीत शेख हसीना यांनी डिसेंबरपर्यंत बांगलादेशात परतण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले होते. “बांगलादेशातील राजकीय संकट अनिश्चित काळापर्यंत सुरू राहू दिले जाऊ शकत नाही. त्यामुळेच मी डिसेंबरपर्यंत परतण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. मायदेशात परतण्याची निश्चित तारीख, वेळ आणि प्रवेशाचा मार्ग योग्य वेळी जाहीर करेन,” असे त्यांनी त्या मुलाखतीत म्हटले होते. दरम्यान, शेख हसीना यांच्या ताज्या विधानामुळे त्यांच्या संभाव्य मायदेशवापसीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, बांगलादेशात परतण्याची निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.







