सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून भैय्या माने यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. भाजपने ही जागा मागितली तरी राष्ट्रवादी ती सोडणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. रविवारी सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. यावेळी भैय्या माने, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले की, मागील विधान परिषद निवडणुकीवेळी आमदार अरुण लाड यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यापूर्वी भैय्या माने यांना पुढील वेळी संधी देण्याचा शब्द दिला होता. ‘मी आता लढतो, पुढच्या वेळी तुम्ही लढा,’ असे अरुण लाड यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यामुळे आता त्यांनी आपला शब्द पाळावा आणि मुलगा शरद लाड यांची समजूत काढावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.

शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबाबतही मुश्रीफ यांनी भाष्य केले. राष्ट्रवादीचा आगामी पदवीधर मतदारसंघातील उमेदवार कोण असणार, याची कल्पना आल्यामुळेच शरद लाड यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला असावा, असे ते म्हणाले. “पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून भैय्या माने लढणार आहेत, हे आम्ही स्पष्ट केले आहे. भाजपने ही जागा मागितली तरी ती आम्ही देणार नाही. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना समजावून सांगू,” असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

भैय्या माने यांचे शिक्षण क्षेत्रातील काम प्रभावी असून, मागील निवडणुकीत त्यांनी अरुण लाड यांच्यासाठी माघार घेतली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने ही जागा जिंकली असल्याने आगामी निवडणुकीत या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. “राष्ट्रवादीचा अश्वमेध यज्ञाचा घोडा आता सुटला आहे. तो थांबणार नाही,” असे म्हणत मुश्रीफ यांनी पक्षाच्या आगामी राजकीय वाटचालीचे संकेत दिले.

सांगलीचे पालकमंत्री होण्याची इच्छा
दरम्यान, सांगली जिल्ह्यात निधी वाटपात दुजाभाव होत असल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून निधी वाटपात छोट्या पक्षांबाबत भेदभाव होत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत आपण चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “देशात सत्ता असलेल्या पक्षाने छोट्या पक्षांबाबत अशा पद्धतीने वागू नये. निधी वाटपात आम्हाला योग्य सन्मान मिळायला हवा,” अशी अपेक्षा मुश्रीफ यांनी व्यक्त केली. तसेच, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगली जिल्ह्याचे संपर्कमंत्रीपद घेण्याचा विचार असल्याचेही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.







