कोल्हापूर : शरद कोरणे यांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात समोर आलेल्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे कोराणे कुटुंबियांना धक्का बसला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये रविकिरण इंगवले याने शरद कोरणे यांना जेलमध्ये एचआयव्हीचे इंजेक्शन देऊन त्यांचा खून केल्याचा तसेच तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून सम्राट कोराणे यांना प्रकरणात अडकविल्याची कबुली दिली आहे. ज्या अर्थी रविकिरण इंगवले स्वतः म्हणतो, मी शरद कोरणेला एचआयव्हीचे इंजेक्शन देऊन जेलमध्ये मारून टाकले. कोणी स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देत नाही पण रवि इंगवले याने स्वतः कबूल केले आहे. त्यामुळे कोराणे कुटुंबीयांवर अन्याय झाला असून त्या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी करावी, अशी मागणी नगरसेविका अर्चना कोराणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
हे ही वाचा…
त्या म्हणाल्या की, संपूर्ण कोराणे कुटुंबीय आणि शिवाजी पेठ आमच्या पाठीशी असून आम्ही लवकरच जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार आहोत. कोराणे कुटुंबाला संपवण्याचा विडा त्याने उचलला असल्याचे तो म्हणतो. पण कोराणे कुटुंबाने संपूर्ण शहराला मदतीचा हात दिला आहे. आमच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला त्याने ठार मारले, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. रवी इंगवलेवर खुनाचा खटला दाखल करून त्याला तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे.

हर्षल सुर्वे म्हणाले की, गेली अनेक वर्षे रवी इंगवलेने शहरातील नागरिकांना ऑडिओ-व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणे, महिलांचे शोषण करणे, अत्याचार करणे, जागा बळकावणे, लुबाडणे असे अनेक गैरप्रकार केले आहेत. या सर्वाची चौकशी झालीच पाहिजे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित भाऊ चव्हाण नगरसेविका अर्चना उत्तम कोराने, नगरसेविका मंगलताई साळोखे, नगरसेवक प्रसाद चव्हाण, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, वेताळ तालमीचे अध्यक्ष अजित चव्हाण, शिवाजी जाधव, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, श्री वेताळ तालमीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते







