

WTI चे प्रकल्पप्रमुख प्रसनजीत शील म्हणाले, “मानव आणि वाघ यांच्यात सहअस्तित्व निर्माण करण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद पथकाचे सदस्य स्वयंसेवी संरक्षक म्हणून काम करतात. ते स्थानिक नागरिक आणि वन विभाग यांच्यातील दुवा आहेत. संघर्ष आणि सहअस्तित्व याविषयीचे मूलभूत ज्ञान तसेच कौशल्यवृद्धी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे गावांमध्ये वाघ शिरल्यास बाहेरील यंत्रणेवर वारंवार अवलंबून न राहता ते स्वतः परिस्थिती हाताळू शकतात.”

WTI च्या संघर्ष निवारण आणि सहअस्तित्व विभागाचे व्यवस्थापक व प्रमुख अभिषेक घोषाल यांनी सांगितले की, सुंदरबनमधील वाघांविषयी स्थानिक पातळीवर असलेल्या समजुती आणि गैरसमजांमुळे वाघ गावात शिरल्यावर ग्रामस्थांची प्रतिक्रिया प्रभावित होते. ते म्हणाले, “आमच्या प्रशिक्षणातून प्राथमिक प्रतिसाद पथकाच्या सदस्यांना संघर्ष आणि सहअस्तित्वाच्या मूलभूत संकल्पना, वाघांचा नैसर्गिक इतिहास, त्यांचे वर्तन आणि वैज्ञानिक पद्धतीने संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली जाते. यामुळे लोक आणि वाघ या दोघांचीही सुरक्षितता सुनिश्चित करत सदस्य संवेदनशील व सन्मानपूर्वक पद्धतीने परिस्थिती हाताळू शकतात.”

‘बाघ बंधू’ अर्थात वाघांचा मित्र म्हणून ओळखले जाणारे अनुभवी प्राथमिक प्रतिसाद पथकाचे सदस्य अजय कुमार दास म्हणाले, “सुंदरबनमधील वाघ आणि खारफुटीच्या जंगलांचे स्थानिक संरक्षक म्हणून आमची भूमिका आहे. त्याचबरोबर वाघ गावात आल्यास ग्रामस्थांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही आमच्यावर आहे.”

Amaron
९८ स्वयंसेवकांचे जाळे; २४ किलोमीटरच्या कुंपणाची देखभाल
WTI ने २०१८-१९ पासून भारतीय सुंदरबन परिसरात मानव-वाघ सहअस्तित्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या प्रकल्पांतर्गत कुलतली भागात आतापर्यंत ९८ प्राथमिक प्रतिसाद पथक सदस्यांचे जाळे उभारले आहे. यामध्ये १८ महिलांचा समावेश आहे. हे स्वयंसेवक संघर्ष टाळण्यासाठी ग्रामस्थ आणि वन विभागाला मदत करतात. तसेच कुलतलीच्या पूर्व किनारपट्टीवर उभारण्यात आलेल्या सुमारे २४ किलोमीटर लांबीच्या नायलॉन जाळीच्या कुंपणावर देखरेख ठेवणे आणि त्याची देखभाल करणे, ही जबाबदारीही ते पार पाडतात.







