मुंबई : ऑस्ट्रेलियात कम्युनिटी (स्थानिक) स्तरावर खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतर अनाया बांगर आपला क्रिकेटचा प्रवास नव्याने सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. अजूनही तिला संघ मिळालेला नसला, तरी तेथे खेळून आणि चांगली कामगिरी करून पुढील वर्षी ‘वुमेन्स बिग बॅश लीग’ (WBBL) मध्ये संधी मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास मदत होईल, अशी ट्रान्सजेंडर अनायाला आशा आहे. मात्र, तिच्या या महत्त्वाकांक्षेला सहानभूतीसोबतच टीकेचाही सामना करावा लागत आहे. दक्षिण आफ्रिकेची दिग्गज खेळाडू मारिझान कॅप हिने अनायाच्या WBBL मधील संधीच्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित करत शुक्रवारी याला “पूर्णपणे हास्यास्पद” (absolutely ridiculous) म्हटले.

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांचा एक अहवाल तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत कॅपने लिहिले, “हे पूर्णपणे हास्यास्पद आहे. याला परवानगी दिली जाऊ नये.” ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटमध्ये खेळण्याच्या तिच्या प्रयत्नांवर होणाऱ्या टीकेला, ज्यामध्ये मारिझान कॅपच्या टिप्पण्यांचाही समावेश आहे, अनायाने प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणाली की, तिच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी या विषयावर स्वतःचे ज्ञान वाढवले पाहिजे. तसेच तिने ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे लक्ष वेधले, ज्यांचे ती पूर्णपणे पालन करत आहे.

“मला वाटते की ज्यांना याविरोधात आवाज उठवायचा आहे, त्यांनी प्रत्यक्षात या विषयावर स्वतःचे ज्ञान वाढवले पाहिजे. मी आधीच कोणताच अयोग्य फायदा न मिळण्याबाबत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत आवश्यक ती माहिती दिली आहे. जरी कोणाचे वैयक्तिक मत अशा प्रकारचे असेल, तर त्यांनी जाऊन स्वतःचे ज्ञान वाढवावे अशी मी आशा करते,” असे ती म्हणाली. जर तिच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी निर्धारित मर्यादेत राहिली, तर अनायाला पुढील वर्षी मार्चमध्ये WBBL मध्ये खेळण्याची आशा आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) संपर्क साधल्यानंतर मिळालेल्या प्रतिसादाबद्दल २५ वर्षीय अनायाने आपली निराशा व्यक्त केली. संवादाचा अभाव हृदयद्रावक असल्याचे सांगत तिने बीसीसीआयला विनंती केली की, तिच्या अनुभवाचा वापर करून भारतात महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर सहभागाबाबत धोरण आखण्यासाठी सुरुवात करावी. मला माहित होते की लिंग बदलाच्या (transitioning) प्रक्रियेमुळे मला क्रिकेटपासून दूर जावे लागेल… मला आशा आहे की बीसीसीआय याबाबतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवेल आणि या विषयाशी संबंधित धोरणे तयार करण्याचा प्रयत्न करेल, कारण मी भारतातील अशी पहिलीच केस आहे. माझ्या संपूर्ण प्रवासातील माझे अनुभव आणि निष्कर्ष मांडण्यासाठी, तसेच आपल्या देशासाठी आणि भविष्यात महिला खेळांसाठी काय सर्वोत्तम ठरेल हे सांगण्यासाठी या टीमचा भाग होण्यास मला आनंद होईल,” असे ती म्हणाली.







