भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, पहिला वनडे : २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या शानदार शतकांचा मोठा वाटा राहिला. २९६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ३२ धावांवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी करत शानदार शतक झळकावले.

दुसऱ्या बाजूला विराट कोहलीनेही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत आणखी एक शतक झळकावले. त्याने १५ हजार वनडे धावांचा टप्पाही पार केला. कोहलीने गुडाकेश मोतीच्या गोलंदाजीवर थेट षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील ५५वे शतक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण ८६वे शतक ठरले. शुभमन गिलने ११० धावांची शानदार खेळी केली. मात्र, रोस्टन चेसच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याचा झेल ज्वेल अँड्र्यूने सीमारेषेजवळ टिपला. त्यानंतर रुतुराज गायकवाडने विराट कोहलीची साथ देण्यासाठी मैदानात प्रवेश केला. गिल बाद झाला त्यावेळी भारताला विजयासाठी केवळ ७० धावांची गरज होती.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वेस्ट इंडिजने ५० षटकांत ७ बाद २९५ धावा केल्या. जस्टिन ग्रीव्ह्जने शानदार १०१ धावांची खेळी करत डावाला आकार दिला. जॉन कॅम्पबेलने ६२, तर अमीर जांगूने ५८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. एकवेळ वेस्ट इंडिजची धावसंख्या १३५ धावांवर बिनबाद होती. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली आणि वेस्ट इंडिजची अवस्था १९८ धावांवर ५ बाद अशी झाली.

Amaron
भारताकडून कुलदीप यादव सर्वाधिक प्रभावी ठरला. त्याने १० षटकांत ४० धावा देत ४ बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णाने २ बळी घेतले, तर नितीश कुमार रेड्डीने एक विकेट मिळवली. विराट कोहलीच्या आणखी एका शतकामुळे भारताने लक्ष्य सहज पार करत पहिल्या वनडे सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला.






