
अभिजीत दिपके, नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात
अभिजीत दिपके यांच्या मोर्चाला सायंकाळी ५ वाजता सुरुवात होणार होती. मात्र, मोर्चासाठी निघाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. CJP ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये दिपके हे आपण एकटे असून, केवळ घराबाहेर पडल्याने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे सांगताना ऐकू येतात. यावर पोलिसांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याचे सांगितले आणि त्यांना पोलीस वाहनातून घेऊन गेले.

दिपके यांना ताब्यात घेण्यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनी ते राहत असलेल्या निवासस्थानी जाऊन त्यांना नोटीस बजावली होती. कॅनॉट प्लेस हे आंदोलनासाठी निर्धारित ठिकाण नसल्याचे नमूद करत, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६३ अंतर्गत लागू असलेल्या निर्बंधांचाही नोटिशीत उल्लेख करण्यात आला होता. प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल पार्क आणि राजीव चौक परिसरात १० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. तसेच, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला.

दिपके यांनी तिरंगा मोर्चाचे आवाहन का केले?
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशव्यापी ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाचे आवाहन केले होते. राष्ट्रीय ध्वज हातात घेऊन सायंकाळी ५ वाजता कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क येथे एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले होते. CJP चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे दिपके यांनी सांगितले. तिरंगा फडकवणे हा गुन्हा नसल्याचे नमूद करत त्यांनी देशातील इतर शहरांमध्येही अशाच प्रकारची आंदोलने करण्याचे आवाहन केले होते. या आंदोलनाच्या आवाहनामुळे आपल्यालाही अटक होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले होते. सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

Amaron
मुंबईत CJP च्या मोर्चाला पोलिसांची परवानगी
दरम्यान, मुंबईत ‘कॉकरोच जनता पार्टी’ला शुक्रवारी आझाद मैदान येथे ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी दिल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलिसांचे उपआयुक्त मनीष कलवानिया यांनी गुरुवारी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना या परवानगीला दुजोरा दिला. आयोजकांनी हा मोर्चा केवळ आझाद मैदान येथेच घेण्यात येईल, असे स्पष्ट केले असल्याचे कलवानिया यांनी सांगितले. आझाद मैदान हे आंदोलनासाठी निर्धारित ठिकाण असल्याने मोर्चाला परवानगी देण्यात आल्याचे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले. CJP ने दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्याशी एकजूट व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे.







