मुंबई : देशातील वाढती महागाई, दुष्काळी परिस्थिती, नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत मोठं भाकीत केलं आहे. येत्या चार-पाच महिन्यांत देशात मोठ्या घडामोडी घडतील. परिस्थिती अशी निर्माण होईल की, एक वेळ अशी येईल जेव्हा देशाला पंतप्रधानच नसेल, असं खळबळजनक विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी देशातील वाढत्या अस्वस्थतेवर भाष्य केलं. ते म्हणाले, “पुढच्या चार-पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होईल, हे निश्चित आहे. येत्या काळात अनेक गोष्टी बाहेर येतील. सरकारकडून चुका होत राहतील आणि हे आता थांबणार नाही. पुढच्या काही महिन्यांत संपूर्ण देश रस्त्यावर उतरला, तरी मला आश्चर्य वाटणार नाही.”

‘प्रत्येकाच्या मनात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा राग’
देशातील विविध आंदोलनांचा संदर्भ देताना राज ठाकरे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन झालं, तर अलीकडे निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा संबंधित प्रश्नाशी थेट संबंध असेलच असं नाही. मात्र, प्रत्येकाच्या मनात कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल राग आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी विविध आंदोलनं माध्यम ठरत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

‘दुष्काळ आणि अन्नधान्याच्या टंचाईचं संकट गंभीर होऊ शकतं’
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरही राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. राज्यातील ३०० ते ३२५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली. पुढील काळात अन्नधान्याच्या टंचाईसह निर्माण होणाऱ्या समस्या सरकारला हाताळणं कठीण जाईल, असं ते म्हणाले. देशात इतरही काही घडामोडी घडतील आणि त्यातून अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की, देशाला पंतप्रधानच नसेल, असं भाकीतही त्यांनी व्यक्त केलं. आता पुढे काय होतं, हे पाहावं लागेल, असंही त्यांनी नमूद केलं.

Amaron
‘ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’
यावेळी राज ठाकरे यांनी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीचाही पुनरुच्चार केला. भारतासारख्या देशात निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचा वापर करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करत विकसित देशांमध्येही बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात, असा युक्तिवाद त्यांनी केला. एकूणच, आगामी चार-पाच महिन्यांत देशात मोठ्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त करत राज ठाकरे यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.







