
या कथित ऑडिओ क्लिपची न्यायवैज्ञानिक (फॉरेन्सिक) तपासणी करणे, तांत्रिक पुराव्यांची पडताळणी करणे आणि प्रकरणाच्या सर्व बाजूंची निष्पक्ष चौकशी करणे, अशी जबाबदारी या पथकावर सोपविण्यात आली आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी २२ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे पत्रकार परिषद घेऊन ही कथित ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली होती. या क्लिपमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे-पाटील यांना ५०० कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आता पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.

एसआयटीमध्ये कोणाचा समावेश?
या विशेष तपास पथकाच्या अध्यक्षपदी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आणि पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे हे या पथकाचे सदस्य असतील. प्रकरणाच्या सर्व पैलूंची तपासणी करण्यासाठी आवश्यक अधिकारी नियुक्त करून तपास पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Amaron
माझ्याकडे आणखी चार ऑडिओ क्लिप; जरांगे-पाटील यांचा दावा
वडीगोद्री : ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्याकडे आणखी चार ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला आहे.सोमवारी अंकुशनगर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. या कथित ऑडिओ क्लिपमागे भाजपमधील काही व्यक्ती असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शकपणे होईल, अशी अपेक्षा जरांगे-पाटील यांनी व्यक्त केली.







