नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर देशाच्या आत्म्यावर हल्ला केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. ‘इंडिया’ आघाडीतर्फे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जनमहाभियोग’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील विविध आरोपांचा समावेश असलेला जनमहाभियोग प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

राहुल गांधी म्हणाले की, देशातील निवडणूक आयोगासह विविध संस्थांवर कब्जा करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. विरोधकांसमोर आता दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसल्याने जनमहाभियोगाचे आयोजन करावे लागले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाचे कामकाज तीन तास २३ मिनिटे चालले. लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी अध्यक्षस्थान भूषवले. खरगे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनमहाभियोगाचा प्रस्ताव मांडला. उपस्थितांनी तो एकमताने मंजूर केला.

काँग्रेससह १९ विरोधी पक्षांचे २१५ खासदार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्ञानेश कुमार यांना पद सोडावे लागेल, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ज्या संस्थेचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्याच संस्थेच्या आड ते लपत असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्रातील काही नेत्यांच्या हातचे ते बाहुले बनल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

विरोधकांचे सहा प्रमुख आरोप
‘इंडिया’ आघाडीने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सहा प्रमुख आरोप केले आहेत.
- निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा कट रचल्याचा आरोप.
- विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतून १३.३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा दावा.
- संसदेला विश्वासात न घेता फॉर्म-६ संदर्भात निर्णय घेतल्याचा आरोप.
- ‘इकॉमनेट’च्या माध्यमातून मतदार याद्यांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा.
- अन्य दोन निवडणूक आयुक्तांना बाजूला ठेवून एकट्याने निर्णय घेतल्याचा आरोप.
- केंद्र सरकारच्या इशाऱ्यांनुसार काम केल्याचा दावा.

आज दिल्लीत मोर्चा; रामलीला मैदानावर सभा
निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात आवाज उठवण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीने रविवारी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. दुपारी १२ वाजता मिंटो रोड-कनॉट प्लेस चौकातून मोर्चाला सुरुवात होणार असून, त्याची सांगता रामलीला मैदानावर होईल. येथे आघाडीची जाहीर सभा होणार आहे. राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधून १३.३ कोटी लोकांची नावे वगळण्यात आल्याचा दावा केला. ही संख्या एकूण मतदारांच्या सुमारे १५ टक्के असल्याचे ते म्हणाले. या मतदारांनी मतदान केले नसल्याचे निवडणूक आयोग सांगत असेल, तर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असा युक्तिवादही त्यांनी केला.

Amaron






