गोकुळच्या अध्यक्षपदावरून चुयेकरांच्या वारसाला रोखण्याचा महायुतीचा डाव; निर्णयाविरोधात कायदेशीर लढा देणार
कोल्हापूर : गोकुळ दूध संघावर मतदानाचा अधिकार असलेले चार अशासकीय सदस्य नियुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा खून आहे. गोकुळचे शिल्पकार आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या वारसाला अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा राजकीय खेळी केली आहे. गोकुळबाबत असे अन्यायकारक निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरची स्वाभिमानी जनता कधीही माफ करणार नाही, अशी टीका काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी केली.
हे ही वाचा…
गोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार : आमदार सतेज पाटील
यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की, गोकुळच्या निवडणुकीत साडेपाच लाख दूध उत्पादकांनी समविचारी आघाडीला बहुमत दिले आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार समविचारी आघाडीचाच अध्यक्ष होणे अपेक्षित होते. मात्र, महायुतीने सत्तेचा वापर करून अध्यक्ष निवडीच्या सभेला संचालकांना अनुपस्थित ठेवणे आणि मतदानाचा अधिकार असलेले चार अशासकीय सदस्य नियुक्त करणे, असे प्रकार केले आहेत. या निर्णयांवरून महायुतीच्या नेत्यांना लोकशाही मान्य नसल्याचे स्पष्ट होते. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत आम्ही कोणाचीही अडवणूक केलेली नाही, असा दावा महायुतीच्या नेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून केला आहे.

कायदेशीर लढा देणार, जनतेतही जाणार
सर्किट बेंचमधील सुनावणीदरम्यान निवडून आलेल्या २५ संचालकांमधूनच अध्यक्षांची निवड व्हावी, असा निर्णय देण्यात आला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा अवमान होईल, असे कृत्य राज्य सरकार करणार नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र, तसा प्रयत्न झाल्यास त्याला कायदेशीर विरोध केला जाईल. तसेच जनतेमध्ये जाऊन या निर्णयाविरोधात सातत्याने आवाज उठवू, असा इशाराही पाटील यांनी दिला.

आता रस्त्यावर उतरून संघर्ष करणार
गोकुळचे अध्यक्षपद बहुमत असूनही समविचारी आघाडीला मिळू नये, यासाठी शासनाने कारस्थान केल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. याविरोधात उपलब्ध सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार असून, आता गप्प बसणार नाही, तर थेट रस्त्यावर उतरून संघर्ष करू, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.’ब्रँड कोल्हापूर’ पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मतदारांनी विरोधी पक्षात राहण्याचा कौल दिला असेल, तर तो स्वीकारला पाहिजे. माझ्या पत्रकाला उत्तर देण्यासाठी महायुतीने पत्रक प्रसिद्ध केले. मात्र, त्या पत्रकावर सह्या कोणी करायच्या, यावरूनही महायुतीमध्ये वाद झाल्याचे समजते. सत्तेची ही समीकरणे कायम राहणार नाहीत. २०२९ मध्ये ती निश्चितच बदलतील, असा दावाही त्यांनी केला.

ऊसदराच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी तोडगा काढावा
ऊसदराच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली. मुंबईत न थांबता चार्टर्ड विमानाने कोल्हापुरात येऊन त्यांनी यासंदर्भात बैठक घ्यायला हवी होती. आपण पालकमंत्री असताना ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेऊन तोडगा काढला होता. सध्याच्या पालकमंत्र्यांनी एक बैठक घेतली; मात्र त्यानंतर पुढील बैठक झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

दोन नगरसेवकांचा पाठिंबा हवा असेल तर महापौरपद आम्हाला द्या
महानगरपालिकेतील कोरम पूर्ण करण्यासाठी समविचारी आघाडीच्या दोन संचालकांचा पाठिंबा मागत असल्याचे महायुतीच्या नेत्यांचे विधान हास्यास्पद आहे. जर केवळ पाठिंब्याचीच गरज असेल, तर महानगरपालिकेत आमचे पाच नगरसेवक कमी आहेत. महायुतीने आम्हाला पाठिंबा द्यावा आणि महापौरपद आमच्या पक्षाला द्यावे, असे प्रत्युत्तरही सतेज पाटील यांनी दिले.







