तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केली आहे. या नाकेबंदीचा जागतिक पातळीवरील खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर तीन अटींचा प्रस्ताव ठेवला आहे.

अमेरिकेने या तीन अटी मान्य केल्यास सात दिवसांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची तयारी इराणने दर्शवली आहे. तसेच अण्वस्त्र कार्यक्रमासंदर्भात दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते, असे संकेतही इराणने दिले आहेत. आता या प्रस्तावावर निर्णय अमेरिकेने घ्यायचा आहे, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले. अराघची यांच्या म्हणण्यानुसार, इराणने कतारच्या माध्यमातून हा प्रस्ताव अमेरिकेपर्यंत पोहोचवला आहे. प्रस्तावानुसार अमेरिकेला काही पावले उचलावी लागणार आहेत. या मागण्या नवीन नसून जूनमध्ये झालेल्या करारात त्यांचा समावेश असल्याचा दावाही अराघची यांनी केला. अमेरिकेने प्रस्ताव स्वीकारताच सात दिवसांची कालमर्यादा सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

इराणच्या तीन अटी कोणत्या?
होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर पुढील तीन अटी ठेवल्या आहेत :
- इराणच्या बंदरांवरील अमेरिकन नौदलाची नाकेबंदी हटवावी.
- इराणच्या तेल विक्रीवरील निर्बंधांमध्ये सवलत द्यावी.
- लेबेनॉनचा समावेश असलेला युद्धविराम लागू करावा.
या अटी पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला चार ते पाच दिवस लागू शकतात, असे अराघची यांनी म्हटले आहे. त्यानंतर सहाव्या दिवशी होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईल आणि सातव्या दिवशी अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा सुरू केली जाईल, असा प्रस्ताव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘दबावाखाली इराण माघार घेणार नाही’
अमेरिकेने आता या प्रस्तावावर निर्णय घ्यायचा आहे. दबाव, धमकी किंवा घाबरवण्याच्या प्रयत्नांना इराण बळी पडणार नाही. दबावाखाली आपल्या स्वायत्त अधिकारांपासून इराण माघार घेणार नाही, असेही अराघची यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने प्रस्ताव स्वीकारल्यास त्याच दिवसापासून सात दिवसांची कालमर्यादा सुरू होईल. या करारासाठी आवश्यक तयारी आधीच पूर्ण करण्यात आली असल्याचा दावा अराघची यांनी केला. दोन्ही देशांमध्ये यापूर्वीही तोडगा काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले; मात्र त्यातून अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.







