जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे
कोल्हापूर : कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य व कडधान्य पिकांच्या क्षेत्रविस्तारासाठी रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा व मसूर पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके, बियाणे मिनीकिट वितरण आणि प्रमाणित बियाणे वितरण हे घटक राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकरी गट व शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात रब्बी ज्वारी पिकासाठी ७८० हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. याअंतर्गत पात्र शेतकरी गटातील लाभार्थी शेतकऱ्यांना किमान ०.४० हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये बियाण्यांसह बीजप्रक्रिया, पीक संरक्षण निविष्ठा, माती नमुना तपासणी, प्रशिक्षण व प्रशिक्षण साहित्य आदी बाबींचा समावेश आहे.

रब्बी ज्वारीच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांना १० वर्षांच्या आतील वाणांसाठी प्रति क्विंटल ३ हजार रुपये, तर १० वर्षांवरील वाणांसाठी प्रति क्विंटल १ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या घटकांतर्गत आर्थिक सहाय्याची मर्यादा प्रति शेतकरी कमाल एक हेक्टरपर्यंत राहील. तसेच हरभरा पिकासाठी २०० बियाणे मिनीकिट आणि मसूर पिकासाठी ५०० बियाणे मिनीकिट वितरित करण्याचे नियोजन आहे.

Amaron
योजनेसाठी महत्त्वाच्या अटी व सूचना : या योजनेचे अर्ज केवळ महाडीबीटी पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी (Farmer ID) असणे अनिवार्य आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र असतील. तर बियाणे मिनीकिट व प्रमाणित बियाणे वितरणासाठी वैयक्तिक शेतकरी पात्र राहतील. अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर लाभ देण्यात येणार आहे. प्राप्त बियाण्यांचा वापर प्रत्यक्ष पेरणीसाठी करणे आवश्यक असून, योजनेची अंमलबजावणी तालुकानिहाय व पिकनिहाय मंजूर उद्दिष्टांनुसार करण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकरी गट व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर तातडीने ऑनलाइन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.







