म्हैसूर : एकेकाळी महिलांसाठी अनपेक्षित आणि आव्हानात्मक मानला जाणारा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आता म्हैसूरमधील अनेक महिलांसाठी स्वावलंबनाचा प्रभावी मार्ग ठरत आहे. कुटुंबातील पुरुषाचा, विशेषतः पतीचा आधार गमावल्यानंतर या महिलांनी रिक्षा चालवून स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. शहरातील तब्बल ४५ महिला रिक्षाचालकांनी संघर्षातून स्वतःचे आयुष्य नव्याने उभे केले आहे. गायत्रीपुरम येथील उमा यांच्या आयुष्यात पतीच्या निधनानंतर मोठे संकट आले. त्यांचे पती ट्रकचालक होते. मात्र, परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी रिक्षा चालविण्यास सुरुवात केली. आज त्या दररोज सरासरी एक हजार रुपये कमावतात. दसऱ्यासारख्या सणांच्या काळात त्यांची रोजची कमाई १,५०० ते २,००० रुपयांपर्यंत पोहोचते.

मुलांची जबाबदारी आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन उमा रात्री साडेदहा वाजेपर्यंत रिक्षा चालवतात. म्हैसूरमधील ‘तलिरू फाउंडेशन’ने आयोजित केलेल्या तीन महिन्यांच्या प्रशिक्षणातून त्यांनी रिक्षा चालविण्याचे कौशल्य आत्मसात केले. महिलांचे दारिद्र्य दूर करून त्यांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे.

‘रिक्षा चालविण्यामुळे मला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली. इतर नोकऱ्यांमध्ये महिन्याच्या शेवटी पगार मिळतो; मात्र या व्यवसायात दररोज उत्पन्न मिळते. तसेच कामाच्या निश्चित वेळा नसल्याने मुलांची काळजी घेण्यासाठीही वेळ काढता येतो,’ असे उमा सांगतात. त्या कराटेपटूही आहेत. भोगादी येथे एकट्याने राहणाऱ्या लक्ष्मी यांच्यासाठीही रिक्षाचालक होण्याची संधी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. ‘या व्यवसायामुळे माझे आयुष्य बदलले. माझा जणू पुनर्जन्मच झाला,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मानसा या रिक्षाचालक महिला शेजारच्या जिल्ह्यांतील दुर्गम भागांतही प्रवाशांची ने-आण करतात. त्यांच्या रिक्षा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे मेंदूच्या ट्यूमरने ग्रस्त असलेल्या आईच्या उपचारांचा खर्च भागविणे शक्य झाले आहे. दुर्गम गावांमध्ये रात्री कार्यक्रम सादर करणाऱ्या महिला नाट्यसंस्थांकडून त्यांना अनेकदा फोन येतात. त्या कलाकारांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवतात. उशीर झाल्यास कधी कधी रिक्षातच रात्र काढून दुसऱ्या दिवशी कलाकारांना परत घेऊन जातात. श्रीरामपुरा येथील एकल पालक असलेल्या मंजुळा यांनी गारमेंट कारखान्यातील नोकरी सोडून रिक्षा चालविण्याचा व्यवसाय स्वीकारला. त्यांच्यासाठीही हा निर्णय फायदेशीर ठरला आहे.

तलिरू फाउंडेशनकडून प्रशिक्षण आणि आर्थिक मदत
तलिरू फाउंडेशनने आतापर्यंत सहा टप्प्यांत महिलांना इलेक्ट्रिक (EV) आणि सीएनजी रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तीन टप्प्यांच्या निवड प्रक्रियेतून पात्र महिलांची निवड केली जाते. त्यानंतर त्यांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देऊन रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासही संस्था सहकार्य करते. या उपक्रमाला ‘स्वावलंबी स्त्री’ प्रकल्पांतर्गत रोटरी म्हैसूर, रोटरी ईस्ट, रोटरी मेट्रो तसेच एन. आर. फाउंडेशनचे अध्यक्ष आर. गुरू यांच्याकडून विविध प्रकारे आर्थिक सहकार्य मिळत आहे.

Amaron
कर्नाटक राज्योत्सवानिमित्त रविवारी महिला रिक्षाचालकांनी आयोजित केलेल्या रॅलीदरम्यान तलिरू फाउंडेशनच्या संस्थापक चित्रा ए. आर. यांनी महिलांसमोरील अडचणी मांडल्या. त्या म्हणाल्या, ‘महिलांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे कर्ज मिळविणे. समाजातील पारंपरिक मानसिकता अजूनही कायम आहे. महिला रिक्षा खरेदीसाठी कर्ज मागतात, तेव्हा बहुतांश वेळा पुरुष जामीनदाराची अट घातली जाते.’ फाउंडेशनकडून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिला अशा कुटुंबांतून येतात, जिथे त्यांना पुरुषांचा आधार नाही. त्यामुळे कर्जासाठी पुरुष जामीनदार मिळविणे त्यांच्यासाठी मोठी समस्या ठरते. भविष्यात अधिकाधिक महिलांना शालेय बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचे संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे चित्रा यांनी सांगितले.

पार्किंगपासून कर्जापर्यंत अनेक अडचणी
महिला रिक्षाचालकांना केवळ कर्ज मिळवितानाच नव्हे, तर रिक्षा थांबविण्यासाठी पार्किंगची जागा मिळवितानाही अडचणींचा सामना करावा लागतो. म्हैसूरसह मंड्या, चामराजनगर आणि कोडगू जिल्ह्यांतील २५ ते ५० वयोगटातील महिलांनी तलिरू फाउंडेशनकडून प्रशिक्षण घेतले आहे. या महिला रिक्षाचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा व्यवसाय स्वीकारल्यानंतर त्यांचे उत्पन्न पूर्वीच्या तुलनेत तीन ते पाच पट वाढले आहे. यापूर्वी त्यांच्यापैकी अनेक महिला सुरक्षा रक्षक, भाजी विक्रेते, फूड डिलिव्हरी कर्मचारी, पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच कारखान्यांमध्ये कामगार म्हणून कार्यरत होत्या. मात्र, अनियमित कामाच्या वेळा आणि तुलनेने कमी उत्पन्न यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

‘ऑटो सखी’तून महिलांचे नेटवर्क; गर्भवतींना मोफत सेवा
महिला रिक्षाचालकांनी ‘ऑटो सखी’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. या माध्यमातून प्रवाशांशी तातडीने संपर्क साधणे आणि एकमेकींना मदत करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, या ग्रुपमधील महिला गर्भवती आणि दिव्यांग व्यक्तींना मोफत प्रवाससेवाही उपलब्ध करून देतात. रिक्षाच्या स्टिअरिंगवर हात ठेवून या महिलांनी केवळ स्वतःच्या आर्थिक परिस्थितीत बदल घडविला नाही, तर कुटुंबाचा आधार बनण्याबरोबरच समाजात स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.







