कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मुलगा नवीद मुश्रीफ यांचा झालेला पराभव हे ठरवून केलेले षड्यंत्र असल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. साखर कारखाने, बँका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील अनेक वर्षांनंतर मिळालेल्या विजयांनंतर हा पराभव वाट्याला आला आहे. या पराभवातून धडा घेतला असून, यापुढे अशा चुका होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजरा साखर कारखान्याच्या २८व्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आणि गोकुळचे नवनिर्वाचित संचालक राजेश पाटील होते.

आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा उल्लेख करताना मुश्रीफ म्हणाले, ‘‘शाहू कारखान्यात येण्यापूर्वी वडिलांच्या निधनानंतर मी शेती करीत होतो. ऊस लागवड, पाणी देणे, वांगी आणि टोमॅटो पिकवणे अशी कामे केली. गाईही पाळल्या असून, आजही म्हशी पाळतो. आमची ५० ते ६० एकर वडिलोपार्जित जमीन आहे. पूर्वी आमची तीन-तीन गुऱ्हाळघरे होती. त्यामुळे हसन मुश्रीफ अचानक जमिनीवर आलेला नाही, तर तो जमिनीतून उगवलेला आहे.’’ गोकुळ निवडणुकीत ज्यांनी जे काही केले, त्याचा योग्य वेळी समाचार घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ यांचा झालेला पराभव हा सर्वांच्याच मनाला धक्का देणारा असल्याचे माजी आमदार आणि गोकुळचे नवनिर्वाचित संचालक राजेश पाटील यांनी सांगितले. मंत्री हसन मुश्रीफ यांची राज्यात ‘श्रावणबाळ’ आणि विकासाभिमुख नेतृत्व अशी ओळख आहे. अशा नेत्याच्या मुलाचा गोकुळ निवडणुकीत पराभव झाला, ही बाब विचार करायला लावणारी आहे. निवडणुकीत जातीयवादी राजकारण आणायला नको होते. दूध उत्पादकांनीही याचा विचार करायला हवा होता, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Amaron
‘‘माझी मुळे जमिनीत घट्ट रुजलेली आहेत. त्यामुळे कोणीही काहीही केले, तरी मला वाकवू शकत नाही. मुलगा नवीद याच्या पराभवामागील बाबी मतदान केंद्रांवरील आकडेवारीवरून स्पष्ट होतात. त्यामुळे हा ठरवून केलेला प्रकार असल्याचे माझे मत आहे. आयुष्यात असे प्रसंग येत असतात. ठेच लागल्यानंतर माणूस जमिनीवर येतो. या पराभवातून आम्ही चुका सुधारू आणि मान ताठ ठेवून पुढील वाटचाल करू,’’ असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई, उपाध्यक्ष अनिल फडके, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, माजी अध्यक्ष विष्णू केसरकर, वसंतराव धुरे, सुभाष देसाई, एम. के. देसाई, नामदेव नार्वेकर, राजू होलम, सहदेव नेवगे आदी उपस्थित होते.







