केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह (केडीसीसी) जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. केडीसीसी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. संलग्न सभासद संस्थांकडून प्रतिनिधींच्या नावांचे ठराव मागवून प्रारूप मतदारयादी तयार करण्यात आली होती.

या यादीवर विविध गटांतून १२३ हरकती दाखल झाल्या होत्या. या सर्व हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली होती. विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम हे गुरुवारी या हरकतींवर निकाल देणार होते. त्यानंतर निवडणूक प्राधिकरणाच्या वेळापत्रकानुसार ३ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या हालचाली गेल्या आठ दिवसांपासून सुरू होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अखेर शासनाने मंगळवारी सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत, त्याच टप्प्यावर थांबवण्याचे आदेश दिले. त्यामुळे केडीसीसी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेलाही ब्रेक लागला आहे.

‘ब’ वर्गातील १९३ संस्थांचाही समावेश
डिसेंबर २०२६ पर्यंत जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहकारी संस्था निवडणुकीस पात्र होणार होत्या. यामध्ये ‘ब’ वर्गातील १९३ संस्था तसेच ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील अन्य संस्थांचा समावेश आहे. शासनाच्या निर्णयामुळे या सर्व संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

Amaron
निवडणुका ऑक्टोबर २०२७ मध्ये होण्याची शक्यता
शासनाने पुढील आदेश येईपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. दुष्काळाची तीव्रता जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतरचा पावसाळा लक्षात घेता निवडणुकांचे नियोजन पुढे ढकलले जाऊ शकते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर २०२७ मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, निवडणुकांच्या पुढील तारखा शासनाच्या आगामी आदेशांवर अवलंबून असतील.
