इराण युद्धामुळे रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाल्याची उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांची कबुली
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने मोठा विजय मिळवत प्रतिनिधीगृह आणि सिनेट या काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. दरम्यान, या पराभवानंतर आपल्यावर महाभियोग चालवला जाण्याची कोणतीही चिंता नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मला महाभियोगाची अजिबात चिंता नाही. डेमोक्रॅट्सनी असा प्रयत्न केल्यास त्यांच्याच पक्षाचे मोठे नुकसान होईल. यशस्वी देश उभारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महाभियोग कशासाठी?” मतमोजणी अद्याप सुरू असून काही जागांचे निकाल जाहीर होणे बाकी आहे. प्रतिनिधीगृहातील ५२, सिनेटमधील दोन आणि राज्यपालपदाच्या दोन जागांचे निकाल अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पराभवासाठी इराण युद्धाला जबाबदार धरले आहे. २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या अनेक मतदारांनी यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने मतदान केल्याचे त्यांनी म्हटले. बुधवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केलेल्या सविस्तर पोस्टमध्ये त्यांनी मतदारांचा मतदानातील सहभाग कमी असणे हे पराभवाचे प्रमुख कारण नसून, ट्रम्प समर्थकांनीच रिपब्लिकन पक्षाच्या विरोधात मतदान केल्याचे नमूद केले. निवडणुकीतील विजयाबद्दल ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे अभिनंदन केले आहे. आपल्या कार्यकाळातील उर्वरित दोन वर्षांत दोन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अन्यथा आपण प्रत्येक विधेयकाला व्हेटो अधिकार वापरून विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला.

सिनेटच्या महत्त्वाच्या जागांवरील निकाल
- मिशिगन : डेमोक्रॅटिक पक्षाचे अब्दुल एल-सय्यद विजयी.
- टेक्सास : डेमोक्रॅटिक पक्षाचे जेम्स टॅलारिको विजयी.
- कॅन्सस : डेमोक्रॅटिक पक्षाचे अॅडम हॅमिल्टन विजयी.
- मेन : डेमोक्रॅटिक पक्षाचे ट्रॉय डी. जॅक्सन विजयी.
- आयोवा : डेमोक्रॅटिक पक्षाचे जोश टुरेक विजयी.
- नेब्रास्का : रिपब्लिकन पक्षाचे पीट रिकेट्स विजयी.
- ओहायो : डेमोक्रॅटिक पक्षाचे शेरॉड ब्राउन विजयी.
- दक्षिण कॅरोलिना : डेमोक्रॅटिक पक्षाच्या अॅनी अँड्र्यूज विजयी.
अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात डेमोक्रॅटिक पक्षाच्या विजयामुळे हकीम जेफ्रीज यांनी इतिहास घडवला आहे. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, ते प्रतिनिधीगृहाचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष (स्पीकर) ठरले आहेत. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागांसाठी आणि सिनेटच्या एकूण १०० जागांपैकी ३५ जागांसाठी मतदान झाले होते.

Amaron
अमेरिकन काँग्रेसचे संख्याबळ
प्रतिनिधीगृह (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज) :
- एकूण जागा : ४३५
- आधीचे संख्याबळ : रिपब्लिकन २१८, डेमोक्रॅट्स २१४, रिपब्लिकन समर्थक एक अपक्ष आणि दोन रिक्त जागा.
- बहुमतासाठी आवश्यक जागा : २१८.
सिनेट :
- एकूण जागा : १००
- मध्यावधी निवडणुकीत मतदान झालेल्या जागा : ३५ (३३ नियमित आणि दोन विशेष निवडणुका).
- आधीचे संख्याबळ : रिपब्लिकन ५३, डेमोक्रॅट्स ४५ आणि दोन अपक्ष.
- बहुमतासाठी आवश्यक जागा : ५१.

मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो. या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर म्हणजेच दोन वर्षांनंतर मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होत नाही. मात्र, राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्या दोन वर्षांतील कामगिरी आणि धोरणांचे मूल्यमापन करण्याची संधी मतदारांना मिळते. या निवडणुकांच्या निकालावरून काँग्रेसच्या प्रतिनिधीगृह आणि सिनेटवर रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅटिक पक्ष यापैकी कोणाचे वर्चस्व राहणार, हे ठरते. त्याचा थेट परिणाम राष्ट्राध्यक्षांना आपली धोरणे आणि योजना राबविण्याच्या क्षमतेवर होतो.







