
काँग्रेसकडून गेल्या काही काळापासून निवडणूक आयोग, मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया आणि ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही निवडणूक प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवले आहेत. तसेच, निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार राज्यांतील विधान परिषद निवडणुकांचा संदर्भ देत काँग्रेसवर निशाणा साधला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये विधान परिषदेच्या २८ जागांसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर मोदी यांनी, “आता काँग्रेसने किती जागा जिंकल्या? तुमचा अंदाज सांगा,” असा उपरोधिक सवाल केला.

कर्नाटकातही काँग्रेसला यश नाही?
या चार राज्यांतील विधान परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असूनही तेथे पक्षाला विधान परिषद निवडणुकीत यश मिळाले नाही. कर्नाटकात भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अर्थात जेडीएस यांच्या आघाडीने चारही जागा जिंकल्याचे वृत्त आहे.

Amaron
उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने चार जागांवर, तर समाजवादी पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला. उर्वरित जागांवरील मतमोजणी सुरू असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. ईव्हीएमवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवरून नव्या राजकीय चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.







