कोल्हापूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (व्यापारी पिके) अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी ऊस विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ऊस पिकातील प्रात्यक्षिके आणि सुपरकेन नर्सरी या घटकांसाठी पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

ऊस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून, जिल्ह्यात ऊस लागवडीसाठी अनुकूल हवामान उपलब्ध आहे. तथापि, काही तालुक्यांतील व गावांतील ऊस उत्पादकता कमी असल्याने आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करून उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादकतेत वाढ करणे आवश्यक आहे. या उद्देशाने ऊस पिकात एक डोळा पद्धतीने लागवड व आंतरपीक प्रात्यक्षिके तसेच पाचट व खोडवा व्यवस्थापन प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत.

प्रात्यक्षिके हा घटक शासकीय यंत्रणेकडे ३१ मार्च २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांमार्फत राबविण्यात येणार आहे. या घटकासाठी शेतकरी गटांना अर्ज करता येतील. तसेच सुपरकेन नर्सरी या घटकासाठी वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. लाभार्थ्यांची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

इच्छुकांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या महाडीबीटी पोर्टल वर ‘बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक’ या पर्यायांतर्गत अर्ज सादर करावेत. शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या तसेच योजनेचा लाभ घेणाऱ्या गट सदस्यांकडे फार्मर आयडी (Farmer ID) असणे आवश्यक आहे. पात्र शेतकरी गट व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर लवकरात लवकर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

Amaron






