कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण गटातून आठ, तर महिला गटातून तीन असे एकूण ११ अर्ज दाखल झाले. यामध्ये संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, शेतकरी संघाचे माजी संचालक सुरेशराव देसाई, हंबीरराव वळके, अॅड. सुरेश कुराडे आणि रेखा सुरेश कुराडे यांचा समावेश आहे. दिवसभरात १३० उमेदवारी अर्जांची विक्री झाली; मात्र अर्ज दाखल करण्यास तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला. आज, गुरुवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांत विविध गटांतून एकूण १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी सर्वाधिक नऊ अर्ज सर्वसाधारण गटातील आहेत. पहिल्या दिवशी तब्बल ४७० अर्जांची विक्री झाली होती, तर दुसऱ्या दिवशी १३० अर्जांची विक्री झाली. त्यामुळे आतापर्यंत ६०० अर्जांची विक्री झाली आहे. तसेच सुमारे ५० मतदार यादींची विक्री झाली आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, जनसुराज्य पक्षासह इतर इच्छुक उमेदवार आज, गुरुवारी मुहूर्तावर अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार, २२ सप्टेंबरपर्यंत आहे. मात्र शुक्रवारपासून सलग तीन दिवस सुटी असल्याने आज मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस आघाडीचे आज शक्तिप्रदर्शन
आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणीत आघाडीचे इच्छुक उमेदवार आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी सुमारे ३०० ते ४०० समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भाजप वगळता महायुतीतील इतर घटक पक्षांनी आपल्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे उमेदवार कधी अर्ज दाखल करणार, याकडे लक्ष लागले आहे. भाजपकडून सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

‘गोकुळ’ची निवडणूक एकसंधपणे लढणार : विश्वास पाटील
‘गोकुळ’ची निवडणूक आम्ही एकसंधपणे लढणार आहोत. भाजप बाजूला नाही, आम्ही सर्वजण एकत्र आहोत. पॅनेलची घोषणा झाल्यानंतर हे स्पष्ट होईल. संघ आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध झाली तर ते चांगलेच आहे. आमचे उमेदवार मुंबईत नव्हे, तर कोल्हापुरातच ठरतील, असे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.‘आम्ही सांगितल्याशिवाय ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नका,’ असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितले होते. त्याचे पालन मी केले आणि महायुतीचाच अध्यक्ष झाला. संस्था अपात्र करणारी शक्ती अदृश्य असल्याने ती मला दिसत नाही, असे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले.

‘आबाजीं’च्या कुटुंबातून आठ अर्ज
‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील (आबाजी) यांनी सर्वसाधारण गटातून दोन, तर इतर मागासवर्गीय गटातून दोन असे एकूण चार अर्ज दाखल केले आहेत. त्यांचे सुपुत्र सचिन पाटील यांनी इतर मागासवर्गीय तसेच सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या स्नुषा पल्लवी सचिन पाटील यांनी सर्वसाधारण गटासह महिला गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पाटील कुटुंबातून एकूण आठ अर्ज दाखल झाले आहेत.







