२ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम
कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना नियमितपणे मिळण्यासाठी ई-केवायसी (e-KYC), बँक खात्याशी आधार संलग्न करणे (Aadhaar Seeding), भूमी अभिलेख नोंद (Land Seeding) आणि AgriStack नोंदणी या बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दि. २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी कोणती कार्यवाही करावी ?
ई-केवायसी पूर्ण करणे : शेतकरी PM-KISAN पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकतात. तसेच जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC) येथे जाऊनही ई-केवायसी पूर्ण करता येईल.
बँक खात्याशी आधार संलग्न करणे : ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही, त्यांनी संबंधित बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्यावे. तसेच जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) अंतर्गत नवीन आधार लिंक खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
भूमी अभिलेख नोंद (Land Seeding) : जमिनीची नोंद PM-KISAN पोर्टलवर प्रलंबित असल्यास शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
AgriStack अंतर्गत Farmer ID : संबंधित गावातील आपले सरकार सेवा केंद्र, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या माध्यमातून AgriStack अंतर्गत प्रलंबित Farmer ID काढून घेण्याची कार्यवाही करावी.

या विशेष मोहिमेदरम्यान गावपातळीवर प्रलंबित लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करून आवश्यक कार्यवाहीसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी दि. ३१ ऑक्टोबर पूर्वी ई-केवायसी, आधार सीडिंग, लँड सीडिंग व AgriStack Farmer ID संदर्भातील आवश्यक कार्यवाही पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Amaron






