कॅमेरॉन ओ’रायली यांच्यासोबत विवाह; लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत असताना त्यांच्या माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्या विवाहाची बातमी समोर आली आहे. जेमिमा यांनी आयरिश-ऑस्ट्रेलियन फायनान्सर आणि अब्जाधीश कॅमेरॉन ओ’रायली यांच्यासोबत विवाह केला आहे. या विवाहाचे काही फोटोही समोर आले असून, सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरू आहे. जेमिमा गोल्डस्मिथ आणि इम्रान खान यांनी १९९५ मध्ये विवाह केला होता. मात्र, जवळपास नऊ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये घटस्फोटाचा निर्णय घेण्यात आला आणि २००५ मध्ये तो औपचारिकरीत्या पूर्ण झाला. या दोघांना सुलेमान आणि कासिम हे दोन मुलगे आहेत.

कोण आहेत कॅमेरॉन ओ’रायली?
६२ वर्षीय कॅमेरॉन ओ’रायली हे दिवंगत मीडिया उद्योगपती आणि माजी आंतरराष्ट्रीय रग्बीपटू सर अँथनी ओ’रायली यांचे पुत्र आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जवळपास दशकभर आपल्या वडिलांच्या मीडिया व्यवसायात काम केले. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियातील एपीएन न्यूज अँड मीडिया या कंपनीत विविध पदांवर काम केले. २००३ मध्ये कॅमेरॉन यांनी बेयार्ड कॅपिटल या खासगी इक्विटी कंपनीची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने स्विस मीटरिंग कंपनी लँडिस+जीवायआरचे अधिग्रहण केले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी २०११ मध्ये ही कंपनी तोशिबाला तब्बल २.३ अब्ज डॉलरमध्ये विकली.

जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह
जेमिमा गोल्डस्मिथ आणि कॅमेरॉन ओ’रायली यांच्या विवाह सोहळ्याला दोन्ही कुटुंबांतील जवळचे सदस्य उपस्थित होते. जेमिमा यांचे भाऊ बेन गोल्डस्मिथ यांनीही त्यांच्या विवाहाला दुजोरा दिला आहे. कॅमेरॉन ओ’रायली यांना चार मुले आहेत. तर जेमिमा आणि इम्रान खान यांना सुलेमान आणि कासिम हे दोन मुलगे आहेत.

इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात
जेमिमा यांच्या विवाहाची बातमी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा इम्रान खान हे २०२३ पासून तुरुंगात आहेत. पाकिस्तानमध्ये सत्तेत असताना भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, इम्रान खान यांनी आपल्यावरील आरोप सातत्याने फेटाळले असून, त्यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे.अलीकडे इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यांच्या वकिलांनी तुरुंगात त्यांची प्रकृती खालावत असल्याचा दावा केला आहे.






