ओस्लो : भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेतील ज्येष्ठ विधिज्ञ नवनेथम ऊर्फ नवी पिल्लई (८५) यांना २०२६चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मानवी हक्कांचे संरक्षण, समानतेचा अधिकार आणि शांततेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे वृत्त आहे.नवी पिल्लई यांनी दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे. तसेच रवांडामधील नरसंहाराशी संबंधित आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्या या न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदीही कार्यरत होत्या. पुढे त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणूनही काम पाहिले.

समानतेच्या अधिकारासाठी महत्त्वपूर्ण योगदान
नरसंहार आणि लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याची चौकट विकसित करण्यामध्ये पिल्लई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेच्या संविधानात समानतेच्या अधिकाराला स्थान मिळावे आणि वर्णभेदाविरोधात ठोस घटनात्मक तरतुदी व्हाव्यात, यासाठीही त्यांनी योगदान दिले.नॉर्वेच्या नोबेल समितीने पिल्लई यांच्या सामाजिक न्यायाप्रती आणि सार्वत्रिक मानवी मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले आहे. संघर्ष किंवा अस्थिर परिस्थितीत संबंधित राष्ट्रे आणि त्यांच्या नेत्यांना जबाबदार धरण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हिंसाचार आणि संघर्षाचा सामना करणाऱ्या पीडितांमध्ये आशा निर्माण झाल्याचे समितीने नमूद केल्याचे वृत्त आहे.







