अरब पक्षांचा आयझेनकोट यांना पाठिंबा; राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग ८ नोव्हेंबरला पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा करणार
इस्रायल : इस्रायलमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेते गादी आयझेनकोट यांना नेतान्याहूंपेक्षा अधिक खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग येत्या रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी कोणत्या खासदाराला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुरुवारी विविध राजकीय पक्षांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान १२० सदस्यांच्या इस्रायली संसदेत (नेसेट) ६७ खासदारांनी गादी आयझेनकोट यांना पाठिंबा दिला, तर ४६ खासदारांनी बेंजामिन नेतान्याहू यांच्या बाजूने कौल दिला. सात खासदारांनी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे. आयझेनकोट यांना अधिक खासदारांचा पाठिंबा मिळाला असला, तरी संसदेत बहुमत सिद्ध करणारे सरकार स्थापन करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. अरब पक्षांच्या पाठिंब्यामुळे त्यांची बाजू मजबूत झाली आहे. मात्र, विरोधी पक्षांमधील मतभेदांमुळे सत्तास्थापनेचा मार्ग कठीण होण्याची शक्यता आहे.

राष्ट्राध्यक्ष हर्झॉग यांनी सांगितले की, कोणता उमेदवार यशस्वीपणे सरकार स्थापन करू शकेल, याचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले, “राजकीय पक्षांसोबत झालेल्या चर्चेचे निकाल वरकरणी स्पष्ट दिसत असले, तरी सरकार स्थापन करण्याची क्षमता कोणामध्ये आहे, हे ठरवण्याचा अधिकार कायद्याने मला दिला आहे. मात्र, विविध राजकीय गटांमध्ये आणि त्यांच्यांतर्गत असलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे सध्या हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पक्षांच्या प्रमुखांशी वैयक्तिक चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न असेल.”

अरब पक्षांचा आयझेनकोट यांना पाठिंबा; मात्र आघाडीतील मतभेद कायम
इस्रायलमधील ११ जागा असलेल्या जॉइंट लिस्ट आणि आठ जागा असलेल्या राम पक्षाने राष्ट्राध्यक्ष हर्झॉग यांच्यासोबतच्या बैठकीत गादी आयझेनकोट यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे त्यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांची संख्या ६७ वर पोहोचली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ६१ खासदारांच्या बहुमतापेक्षा ही संख्या अधिक आहे. मात्र, या पाठिंब्याचा अर्थ सर्व १९ अरब खासदार आयझेनकोट यांच्या सरकारमध्ये सहभागी होतील, असा होत नाही. भविष्यातील सरकारमध्ये अरब पक्षांचा समावेश करायचा की नाही, यावर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत.

यिस्रायल बेतेनू पक्षाचे प्रमुख अविग्दोर लिबरमन यांनी यापूर्वी अरब पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून असलेल्या सरकारला विरोध केला आहे. अरब खासदारांनी हमासला स्पष्टपणे दहशतवादी संघटना संबोधले नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मात्र, अरब पक्षांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हमासच्या हल्ल्याचा निषेध केला होता.

Amaron
युनायटेड तोराह ज्यूडिझम पक्षाचा नेतान्याहूंना पाठिंबा नाही
दुसरीकडे, नेतान्याहू यांनाही राजकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. सात जागा असलेल्या अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ज्यू समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड तोराह ज्यूडिझम पक्षाने नेतान्याहू यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. या पक्षाने आयझेनकोट यांनाही पाठिंबा दिलेला नाही.धार्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स विद्यार्थ्यांना लष्करी सेवेतून सूट देण्याच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. नेतान्याहू यांनी यापूर्वी या विद्यार्थ्यांना लष्करी सेवेतून सूट कायम ठेवली होती. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला कायमस्वरूपी कायदा मंजूर करण्यात त्यांना यश आलेले नाही.

दरम्यान, गाझा, लेबनॉन आणि इराणशी संबंधित युद्धजन्य परिस्थितीमुळे इस्रायलच्या राखीव सैनिकांवर लष्करी सेवेचा ताण कायम आहे. अशा परिस्थितीत धार्मिक विद्यार्थ्यांना लष्करी सेवेतून सूट देण्याचा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे.युनायटेड तोराह ज्यूडिझमचे खासदार आयझॅक पिंड्रस यांनी सांगितले की, आगामी सरकारमध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लष्करी सेवेचा प्रश्न सोडवणे हा त्यांच्या पक्षाचा प्रमुख प्राधान्यक्रम असेल.

आयझेनकोट यांच्यासमोर आघाडी स्थापन करण्याचे आव्हान
आयझेनकोट यांच्या याशर पक्षाने देशात नव्या राष्ट्रीय आणीबाणी सरकारच्या स्थापनेची मागणी केली आहे. मतदारांनी राजकीय बदलाची इच्छा व्यक्त केल्याचे पक्षाने गुरुवारी म्हटले आहे. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांना आपापसातील मतभेद दूर करून एकत्र यावे लागणार आहे. इस्रायलच्या कायद्यानुसार, राष्ट्राध्यक्षांनी सरकार स्थापनेसाठी नियुक्त केलेल्या उमेदवाराला सरकार स्थापन करण्यासाठी २८ दिवसांचा कालावधी मिळतो. आवश्यक असल्यास या मुदतीत आणखी १४ दिवसांची वाढ केली जाऊ शकते. संबंधित उमेदवाराला सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यास राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या खासदाराला संधी देऊ शकतात. नवे सरकार स्थापन होईपर्यंत बेंजामिन नेतान्याहू हेच काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहतील. देशात पुन्हा निवडणुका होऊ नयेत आणि नव्या सरकारच्या स्थापनेबाबत राजकीय पक्षांनी एकमत घडवून आणावे, असे आवाहनही राष्ट्राध्यक्ष हर्झॉग यांनी केले आहे. येत्या ८ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष हर्झॉग सरकार स्थापनेसाठी कोणत्या उमेदवाराला निमंत्रित करणार, हे स्पष्ट होणार आहे.







