दुबई/जेरुसलेम : दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या ‘फ्लाय दुबई’च्या विमानात उड्डाणादरम्यान कॉकपिटमध्ये धक्कादायक प्रकार घडला. सहवैमानिकाने कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी झाल्यानंतरही कॅप्टन यांनी विमानावरील नियंत्रण कायम ठेवत सौदी अरेबियातील ताबुक येथे विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले. विमानात २७ मुलांसह एकूण १७४ प्रवासी होते.

‘फ्लाय दुबई’च्या एफझेड-१०७३ या विमानात ही घटना घडली. हल्ल्यानंतर कॉकपिटमध्ये वैमानिक आणि सहवैमानिक यांच्यात झटापट झाली. या दरम्यान विमानाने आपत्कालीन संकेत पाठवले. विमानाची उंची अवघ्या दोन मिनिटांत सुमारे ३४ हजार फुटांवरून १७ हजार फुटांपर्यंत खाली आल्याची माहिती फ्लाइट-रडारच्या नोंदींवरून समोर आली आहे. या घटनेनंतर विमानाच्या अपहरणाची शक्यता निर्माण झाली होती. इस्रायलने खबरदारीचा उपाय म्हणून लढाऊ विमानेही सज्ज केली होती. मात्र, विमानाने मार्ग बदलत अखेर सौदी अरेबियातील ताबुक येथे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले.

आधी आपत्कालीन, नंतर अपहरणाचा अलर्ट
विमानातून सुरुवातीला ७७०० हा आपत्कालीन कोड पाठवण्यात आला. त्यानंतर काही सेकंदांतच ७५०० हा अपहरणाचा अलर्ट देण्यात आला. त्यामुळे विमानाच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली. फ्लाइट-रडारच्या माहितीनुसार, विमानाची उंची अवघ्या दोन मिनिटांत ३४ हजार फुटांवरून १७ हजार फुटांपर्यंत खाली आली. त्यानंतर विमानाने आपला मार्ग बदलून ताबुकच्या दिशेने प्रवास सुरू केला.

कॉकपिटमध्ये झटापट; प्रवासीही पुढे धावले
कॉकपिटमध्ये वैमानिक आणि सहवैमानिक यांच्यात झटापट झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, सहवैमानिकाने विमान जमिनीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. विमानाची उंची वेगाने कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पुढील भागात बसलेले काही इस्रायली प्रवासी कॉकपिटच्या दिशेने धावले. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, विमान ताबुक येथे सुरक्षित उतरल्याने मोठा अनर्थ टळला.







