बाल संरक्षण, महिला सुरक्षा आणि हेल्पलाईन सेवांची माहिती
कोल्हापूर : ‘सेवा परमो धर्मः’ या संकल्पनेतून प्रेरित सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी बालक व महिलांच्या संरक्षणासह कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि संबंधित कर्मचाऱ्यांना बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, POCSO कायदा तसेच विविध हेल्पलाईन सेवांची माहिती देण्यात आली. गारगोटी, गडहिंग्लज, कागल, हातकणंगले, शिरगाव, शाहूवाडी, भोगावती, पोर्ले तर्फ बोरगाव आणि कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमांतून बालमजुरी, बालभिक्षेकरी, बालविवाह प्रतिबंध तसेच महिला व बालकांच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाहूवाडी आणि भोगावती येथे विद्यार्थ्यांनी बालविवाह रोखण्याची प्रतिज्ञा घेतली.

पोर्ले तर्फ बोरगाव येथील कांदबरी हायस्कूलमध्ये सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच महिला हेल्पलाईन 181, पोलीस हेल्पलाईन 112 आणि चाइल्ड हेल्पलाईन 1098 याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध, लिंग निवडीस प्रतिबंध आणि हुंडा प्रतिबंध यांसारख्या कायद्यांचीही माहिती देण्यात आली. महिला व बाल विकास विभागाच्या या उपक्रमांना विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि संबंधित कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.







