‘नवीन मतदार’ हा उल्लेख हटविण्याची सूचना; जुन्या मतदारांना पूर्वीचा EPIC क्रमांक नमूद करण्याची मुभा देण्याची मागणी
मुंबई : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून नावे वगळल्या गेलेल्या नागरिकांना पुन्हा नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, फॉर्म ६ मधून ‘नवीन मतदार’ हा उल्लेख हटवून, पूर्वीपासून मतदार असलेल्या नागरिकांना त्यांच्या जुन्या मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक नमूद करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाकडे केली आहे.

खोटी घोषणा करण्याची वेळ; मतदारांमध्ये संभ्रम
महाराष्ट्रात झालेल्या एसआयआर प्रक्रियेत ज्या नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली गेली आहेत, त्यांना पुन्हा नाव नोंदवण्यासाठी फॉर्म ६ भरावा लागत आहे. मात्र, हा अर्ज प्रामुख्याने प्रथमच मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या नागरिकांसाठी वापरला जातो. त्यामुळे यापूर्वीच मतदार म्हणून नोंदणी झालेल्या नागरिकांनाही या अर्जाद्वारे पुन्हा नोंदणी करताना आपण प्रथमच मतदार म्हणून नाव नोंदवत असल्याची घोषणा करावी लागत आहे. प्रत्यक्षात हे नागरिक यापूर्वी मतदार यादीत समाविष्ट असल्याने या प्रक्रियेत तांत्रिक आणि कायदेशीर विसंगती निर्माण होत आहे. या परिस्थितीमुळे मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे फॉर्म ६ मध्ये तातडीने आवश्यक बदल करावेत, अशी मागणी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मतदारांना नेमकी अडचण काय?
सध्या फॉर्म ६ हा नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरला जातो. या अर्जातील घोषणेनुसार, अर्जदाराने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रथमच अर्ज केला असून, त्याचे नाव अन्य कोणत्याही विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट नसल्याचे नमूद करावे लागते. मात्र, एसआयआर प्रक्रियेत नाव वगळले गेलेले अनेक नागरिक यापूर्वीच नोंदणीकृत मतदार आहेत. अशा नागरिकांना पुन्हा नोंदणीसाठी फॉर्म ६ भरताना वस्तुस्थितीशी विसंगत घोषणा करावी लागू शकते. त्यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खोटी घोषणा केल्यास शिक्षेची तरतूद
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ नुसार, खोटी घोषणा केल्यास एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे पूर्वीपासून मतदार असलेल्या नागरिकांना पुन्हा नोंदणी करताना चुकीची घोषणा करण्याची वेळ येऊ नये, यासाठी फॉर्म ६ मध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. जुन्या मतदारांना पुन्हा नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी फॉर्म ६ मधील ‘नवीन मतदार’ हा उल्लेख हटविणे आणि जुन्या मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, हे या मागणीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.







