कोल्हापूर : काळम्मावाडी पाणीपुरवठा योजनेच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवरील एक्स्प्रेस फिडर लाइनवर आयसोलेटर बसविण्याचे काम महावितरणकडून सोमवार आणि मंगळवारी करण्यात येणार आहे. या कामासाठी योजनेचा वीजपुरवठा दोन दिवस बंद राहणार असल्याने शहरातील नियमित पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. सोमवार आणि मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, बुधवारीही कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पर्यायी व्यवस्थेतून पाणीपुरवठ्याचा प्रयत्न
वीजपुरवठा बंद असलेल्या कालावधीत महापालिकेकडून शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या पर्यायी व्यवस्थेतून संपूर्ण शहराला आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सलग दोन दिवस नियमित पाणीपुरवठा होणार नसून, त्यानंतरही काही भागांत पाण्याचा दाब कमी राहू शकतो. या कामाचा परिणाम शहरातील ए, बी आणि ई वॉर्डांतील विविध भागांवर होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा
वीजपुरवठा बंद असताना पर्यायी पंपिंग व्यवस्थेच्या मदतीने पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, पाण्याची उपलब्धता आणि पर्यायी व्यवस्थेच्या मर्यादा लक्षात घेता नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळेलच, असे नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

राजारामपुरीसह ई वॉर्डातील अनेक भागांना फटका
ई वॉर्डातील संपूर्ण राजारामपुरी परिसरासह शाहू मिल परिसर, शाहू मिल कॉलनी, वैभव हाउसिंग सोसायटी, ग्रीन पार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यू कॉलनी, अरुणोदय, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कूल परिसर, सम्राटनगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारुती चौक, दत्त गल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदिर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डिफेन्स, राजाराम रायफल आणि काटकर माळ या भागांतील पाणीपुरवठा बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित भागांतील नागरिकांनी पाण्याचा वापर नियोजनपूर्वक करावा आणि महापालिकेला सहकार्य करावे.

Amaron






