‘ही भारत-पाकिस्तानची लढाई नाही’; मित्रपक्षातील नेत्यांना सत्तेचा माज न बाळगण्याचा सल्ला, महायुतीला दिला घरचा आहेर
सोलापूर : “जेव्हा सत्तेचा अहंकार वाढतो आणि ‘मी बोलेन तेच योग्य’ अशी भावना निर्माण होते, तेव्हा गोकुळ दूध संघासारखा निकाल लागतो,” अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना जोरदार टोला लगावला. लोकशाहीत सामान्य उमेदवारालाही सन्मानाने वागवले पाहिजे. सत्तेचा माज बाळगल्यास मतदार कसा धडा शिकवतात, याचे उदाहरण गोकुळच्या निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे, असे सांगत सामंत यांनी महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे सुनावले.

पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जयकुमार गोरे यांच्या विधानांवर टीका केली. सामंत म्हणाले, “समोरचा व्यक्ती कितीही सामान्य असला किंवा त्याला चार मतेही मिळणार नसतील, तरी लोकशाहीमध्ये तो अधिकृत उमेदवार असतो. त्यामुळे त्याचा योग्य तो मानसन्मान राखला पाहिजे. एखाद्याला अशा प्रकारे हिणवणे योग्य नाही. आपल्या हातात सत्ता आहे, त्यामुळे आपण करू तीच पूर्वदिशा, असा अहंकार जेव्हा डोक्यात जातो, तेव्हा गोकुळसारखी परिस्थिती निर्माण होते.”

‘ही भारत-पाकिस्तानची लढाई नाही’
निवडणुकीतील राजकीय संघर्षावर भाष्य करताना उदय सामंत म्हणाले, “ही काही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढाई नाही, तर एक मैत्रीपूर्ण लढत आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणालाही कमी लेखण्याची चूक करू नये. राजकारणात काहीही घडू शकते. अहंकार बाळगल्यास जनता काय करू शकते, हे गोकुळच्या मतदारांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दाखवून दिले आहे.”

महायुतीतील नेत्यांना समन्वयाचा सल्ला
महायुतीतील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांनाही संयमाने वागण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “आपण सर्वजण सत्तेत एकत्र आहोत. त्यामुळे प्रत्येकाने सबुरीने आणि समन्वयाने पावले टाकली, तरच महायुतीला सर्व ठिकाणी विजय मिळवता येईल. कोणाचेही मन दुखावले जाणार नाही आणि मित्रपक्षांचा अवमान होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.” गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने मिळविलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी केलेल्या या विधानामुळे महायुतीतील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.







