नांदेड : आधीच अल्पभूधारक शेतकरी, त्यात खरीप हंगाम बुडाला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी नांदेड शहरात उघडकीस आली. मृताच्या नातेवाइकांनी ही आत्महत्या नसून खासगी सावकाराने खून केल्याचा आरोप करीत पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.

चंद्रकांत शिंदे (४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते मुदखेड तालुक्याच्या माळकौठा येथील रहिवासी आहेत. केएफ उर्फ खालसा फायनान्स या खासगी कंपनीच्या चिखलवाडी येथील कार्यालयात चंद्रकांत यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गेल्या महिन्यात चंद्रकांत यांनी या खासगी फायनान्स कंपनीकडून १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कंपनीने ३ हजार रुपये कापून ७ हजार रुपये शेतकऱ्याच्या हातात ठेवले. यावरून व्याजदर ३० टक्के असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. याच पैशाच्या वसुलीसाठी तगादा सुरु होता. १० हजाराच्या कर्जापोटी ७० हजाराची मागणी केली जात होती.

मराठवाड्यात दुष्काळाची झळ सर्वाधिक आहे. पावसाअभावी पिके हातून गेल्याने शेतकरी हतबल आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांत १५० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले आहे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान तर कधी शेतमालाला भाव नाही. या दुष्टचक्रात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. यातूनच कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे बोलले जाते.

गाडीत बसवून आणले, दोन दिवस डांबून ठेवले
गुरुवारी खालसा फायनान्सचे लोक चंद्रकांत यांच्या गावात गेले होते. तेथून त्यांना गाडीत बसवून नांदेडला आणले. त्यांना दोन दिवस डांबून ठेवले.
शनिवारी सकाळी चंद्रकांत यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत फायनान्स कार्यालयात आढळला. मृताच्या आई व मुलीने टाहो फोडत न्यायाची मागणी केली आहे.

Amaron
माझ्या मुलाची आत्महत्या नसून फायनान्स कंपनीने त्याला डांबून ठेवून खूनच केला आहे. दोषींवर खुनाचे गुन्हे दाखल करावेत. सर्जाबाई शिंदे, मृताची आई
नातेवाइकांकडून तक्रार प्राप्त करून कार्यवाही केली जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही. – डॉ. नीलाभ रोहन, जिल्हा पोलिस अधीक्षक

नातेवाइकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या, कारवाईसाठी आक्रोश
ही घटना उघडकीस येताच नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला. नातेवाइकांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वजिराबाद पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. खालसा फायनान्सचा संचालक, व संबंधित कर्मचारी फरार झाले.

चंद्रकांत शिंदे यांना दोन मुले, दोन मुली आहेत. कौटुंबिक कारणासाठी त्यांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जानेच त्यांचा बळी घेतला.
अवाजवी व्याजदर, अपहरण, डांबून ठेवणे, मारहाण यासारखे अनेक गुन्हे खालसा फायनान्सच्या यंत्रणेवर दाखल आहेत. अवैध सावकारांचा खुलेआम धुमाकूळ सुरू असताना त्यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला सहकार विभाग आहे कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे.







