तहकूब सभेनंतर शशिकांत पाटील-चुयेकर यांची ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी निवड; १३ संचालकांचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. अध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेली सभा तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी सभागृहातच स्वतंत्र निवड सभा घेत शशिकांत आनंदराव पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि पाटील-चुयेकर यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला.

महायुतीचे १२ संचालक सभेला अनुपस्थित राहणार असल्याचे निश्चित असल्याने काँग्रेसचे संचालक कायदेशीर तयारीनिशी सभेला उपस्थित होते. सभा तहकूब होताच त्यांनी पाटील-चुयेकर यांच्या अध्यक्षपदी निवडीची मागणी केली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी अमान्य केली. त्यानंतर १३ संचालकांनी सभागृहातच निवड सभा घेत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली. या निवडीबाबत बोलताना शशिकांत पाटील-चुयेकर म्हणाले, “बहुमताने माझी अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या मनात होते, तेच आज घडले आहे. ही निवड कायदेशीर असून आजपासून माझे कामकाज सुरू झाले आहे. आगामी काळात गोकुळचे घटलेले दूध संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

तायशेटे सूचक, तर रेडेकर अनुमोदक

शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक अभिजीत तायशेटे सूचक होते, तर संचालिका अंजना रेडेकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी प्रा. किसन चौगले, राजू आवळे, बाबासाहेब देवकर, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, राहुल देसाई, विश्वजीत जाधव, विद्याधर गुरबे, शशिकांत खोत आणि भाग्यश्री डोंगळे हे संचालक उपस्थित होते.

दिवाळीपूर्वी पुन्हा सभा होण्याची शक्यता

गोकुळ दूध संघाची गुरुवारी तहकूब झालेली सभा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. अशासकीय संचालकांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन त्यासंदर्भातील राजपत्र तातडीने प्रसिद्ध करण्याच्या हालचाली महायुतीच्या पातळीवर सुरू असल्याचे समजते. मंगळवारी (दि. ३) याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सभेच्या गणपूर्तीवरून (कोरम) निर्माण झालेला पेच आगामी आठवड्यात सुटणार का, याकडे दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

पोटनियम काय सांगतात?

गोकुळच्या पोटनियमानुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत अध्यक्ष निवडीची सभा घेणे बंधनकारक आहे. ही मुदत २ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवरून कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता असून, याबाबत निवडणूक प्राधिकरण काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Hasan Mushrif

Hasan Mushrif

काँग्रेस नेत्याच्या जातीयवादी प्रचारामुळे मुलाचा पराभव : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेचा आव आणणाऱ्या काँग्रेस नेत्यानेच जातीयवादी प्रचार केल्यामुळे आपल्या मुलाचा पराभव झाल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. गुरुवारी नंदुरबार येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. तीन पक्षांची आघाडी असूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील मतभेद निवडणूक होईपर्यंत मिटले नाहीत. त्यामुळे महायुतीमध्ये एकसूत्रता राहिली नाही आणि त्याचा फटका निवडणुकीत बसला, अशी कबुलीही मुश्रीफ यांनी दिली. सतेज पाटील १४ संचालकांचा कोरम हा तांत्रिक मुद्दा असल्याचे म्हणत असतील, तर १३ संचालकांचे बहुमत हाही तांत्रिक मुद्दाच ठरतो, असे मुश्रीफ म्हणाले.निवडणुकीतील मतांची आकडेवारी मांडताना त्यांनी सांगितले की, महायुतीला सर्वसाधारण गटातील २० जागांसाठी ५३ हजार १४२ मते, तर राखीव गटातील पाच जागांसाठी ११ हजार ९७२ मते मिळाली. अशा प्रकारे महायुतीला एकूण ६५ हजार ११४ मते मिळाली. दुसरीकडे, समविचारी आघाडीला सर्वसाधारण गटात ४८ हजार ६३०, तर राखीव गटात १४ हजार ७०९ मते मिळाली. त्यामुळे एकूण मतांच्या आकडेवारीवरून सभासदांचा कौल कोणाच्या बाजूने होता, हे स्पष्ट होते, असा दावा त्यांनी केला.

‘शशिकांत पाटील-चुयेकर यांना आम्हीच अध्यक्ष करू’

गोकुळ दूध संघाच्या उभारणीत आनंदराव पाटील-चुयेकर यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाला, शशिकांत पाटील-चुयेकर यांना अध्यक्ष करण्याचे मागील अध्यक्ष निवडीच्या वेळीच ठरले होते. मात्र, महायुतीच्या दबावामुळे त्यांना अध्यक्ष करता आले नाही आणि त्यामुळेच आपला मुलगा नवीद अध्यक्ष झाला, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव दोन वेळा अध्यक्षपदासाठी चर्चेत आले, तरी त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे आता त्यांना अध्यक्ष करण्याची जबाबदारी आम्हालाच पार पाडावी लागेल, असेही मुश्रीफ म्हणाले.

satej-patil

satej patil

‘तुमच्या मुलाला चेअरमन करताना मी जातीयवादी नव्हतो का?’ : सतेज पाटील

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मुलगा नवीद मुश्रीफ यांच्या पराभवासाठी काँग्रेस नेत्याने जातीयवादी प्रचार केल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. या आरोपाला काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. “गोकुळच्या अध्यक्षपदासाठी नवीद मुश्रीफ यांचे नाव असलेले पाकीट मी स्वतः विश्वास पाटील यांच्याकडे दिले होते. त्यावेळी मी जातीयवादी नव्हतो का?” असा सवाल सतेज पाटील यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यात जातीयवाद केला जात नाही. त्यामुळे आपल्यावर जातीयवादी असल्याचा आरोप होणे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. मुश्रीफ यांना ज्यांनी त्रास दिला, त्यांच्याबाबत ते बोलत नाहीत. त्यांच्या मुलाचा पराभव कोणी घडवून आणला, हेही त्यांना माहिती असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.

‘माझा मुलगा अध्यक्ष होणार नव्हता’

महायुतीच्या १२ संचालकांपैकी काही जण सभेला उपस्थित राहण्यास तयार होते. मात्र, त्यांचा नेत्यांशी चर्चा करण्याचा आग्रह होता. त्यानुसार आपण कोणताही अहंकार न ठेवता चर्चा केली; परंतु त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असे सतेज पाटील यांनी सांगितले. “संचालकांना विनंती करण्यामागे शेतकऱ्यांप्रती असलेली माझी तळमळ होती. गोकुळचा अध्यक्ष माझा मुलगा होणार नव्हता,” असे सांगत त्यांनी मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिले.

‘सहकारातील काळा दिवस’

सभेच्या गणपूर्तीसाठी कोरम आवश्यक असतो; मात्र निवड प्रक्रियेसाठी त्याचा वेगळा विचार केला पाहिजे, अशी भूमिका सतेज पाटील यांनी मांडली. गुरुवारी कोरमचा मुद्दा उपस्थित करून सभा तहकूब करणे हा सहकार क्षेत्रातील काळा दिवस असल्याची टीकाही त्यांनी केली.

प्रशासकांच्या काळात २४ कोटींचा तोटा झाल्याचा दावा

गोकुळवर प्रशासक असताना दूध संकलनात घट झाली असून संघाला २४ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला. आणखी काही दिवस प्रशासक राहिल्यास परिस्थिती काय होईल, असा सवाल करत सत्ताधाऱ्यांना गोकुळ दूध संघ बंद पाडायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Amaron

Amaron

 

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

जाधववाडी, कदमवाडी परिसरातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ अंतर्गत जाधववाडी येथील श्री दत्त मंदिर इमारत नूतनीकरण या विकासकामाचा लोकार्पण सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या विकासकामासाठी आमदार राजेश क्षीरसागर...

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांना पदोन्नती, छत्रपती संभाजीनगरला बदली

कोल्हापूर  :  गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मौसमी रावसाहेब चौगुले यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) या रिक्त पदावर...

शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड वैध ठरवा : समविचारी आघाडी हायकोर्टात

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड केली असून ही निवड वैध ठरवावी अशी याचिका समविचारी आघाडीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये केली. या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय...

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली बैठक

शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरु करणार कोल्हापूर : अल निनोच्या प्रभावामुळे सन 2026-27 करिता ऑगस्ट 2027 चे पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले असून शिल्लक राहणाऱ्या पाणी साठ्यावर आधारित सन 2026-27 मधील रब्बी व उन्हाळी हंगामाचा पिण्यासाठी व सिंचनासाठी आराखडा तयार करण्यात...

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह (केडीसीसी) जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय; ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय; ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा

कोल्हापूर : जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नळ पाणीपुरवठा...